अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी, जाहीर कार्यक्रमात चव्हाणांची घोषणा

पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं अशोक चव्हाण यांनी जाहिररीत्या म्हटलंय

Updated: Apr 20, 2019, 02:48 PM IST
अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी, जाहीर कार्यक्रमात चव्हाणांची घोषणा title=

जालना : काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. तशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी जाहीर कार्यक्रमात केलीय. विलास औताडे यांच्या यांच्या प्रचारासाठी भोकरदन इथं आयोजित करण्यात आलेल्या सभेत चव्हाण यांनी ही घोषणा केलीय. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं अशोक चव्हाण यांनी जाहिररीत्या म्हटलंय.

उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि सिल्लोड मतदारसंघातून आमदार असलेल्या अब्दुल सत्तार यांनी गेल्या महिन्यातच राजीनामा दिल्याची घोषणा केली होती. काँग्रेसनं लोकसभा निवडणूक २०१९ साठी औरंगाबादमधून तिकीट नाकारल्यानं सत्तार नाराज होते. या मतदारसंघात काँग्रेसनं यंदा विधान परिषद सदस्य सुभाष झांबड यांना तिकीट दिलंय. यामुळे नाराज झालेल्या सत्तार यांनी महिन्याभरापूर्वी आपल्या समर्थकांद्वारे पक्षाच्या स्थानिक कार्यालयातून ३०० खुर्च्या उचलून नेल्याची घटना समोर आली होती. खुर्च्या नसल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांना आपली बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात करावी लागली होती. 

पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर पक्षाविरोधी भूमिका घेत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी ते प्रयत्नशील झाले होते. यासाठी त्यांनी औरंगाबादमधून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

उल्लेखनीय म्हणजे, अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई केल्यानंतर काँग्रेस आता पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांच्याबद्दल काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.