'विकेन्ड का वार'साठी राजकीय दिग्गज सज्ज, प्रचारसभांचा धडाका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पुन्हा एकदा कोल्हापुरात येत आहेत

Updated: Apr 20, 2019, 09:19 AM IST
'विकेन्ड का वार'साठी राजकीय दिग्गज सज्ज, प्रचारसभांचा धडाका title=

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ च्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाआधीचा आज शेवटचा वीकेन्ड आहे. त्यामुळेच अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्ष आणि उमेदवार प्रयत्नशील आहेत. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.

आज, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पुन्हा एकदा कोल्हापुरात येत आहेत. गडहिंग्लजमध्ये ही सभा आयोजित करण्यात आलीय. तसंच प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींची सभादेखील कोल्हापुरात होणार आहे.

तर औरंगाबादेत आज अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची सभा आहे त्यांनी शिवसेनेपेक्षा मोठी सभा करणार असल्याचा दावा केलाय. पैठणमध्ये नितीन गडकरींची महायुतीच्या उमेदवारासाठी सभा आहे. तर नवज्योतसिंग सिध्दू यांची औरंगाबादमध्ये काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.

नेते आणि त्यांच्या आजच्या सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा - नगर, पुणे, सातारा

नितीन गडकरी, भाजपा - औरंगाबाद, पुणे

उद्धव ठाकरे, शिवसेना - कोल्हापूर

पंकजा मुंडे, भाजपा - अहमदनगर

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस - सातारा

अशोक चव्हाण, काँग्रेस - जालना

प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली

'लोकसभेचा रणसंग्राम' आज रत्नागिरी-सिंधुदुर्गात

लोकसभेचा रणसंग्राम हा 'झी २४ तास'चा निवडणूक विशेष कार्यक्रम आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होत आहे. सावंतवाडीच्या सुंदर गार्डनमध्ये हा कार्यक्रम रंगणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील जनतेच्या मनात काय? काय आहेत विकासाचे प्रमुख मुद्दे? कोणते प्रश्न आत्तापर्यंत सुटले आहेत? कोणते प्रलंबित आहेत? या सर्व बिनधास्त आणि थेट मांडण्याची संधी जनतेला मिळणार आहेत. या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि जागरुक मंडळी उपस्थित असणार आहे.