विजयसिंह यांच्या भाजपा प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया

शेकडो समर्थकांसह रणजितसिंह भाजपात दाखल झाले. 

Updated: Mar 21, 2019, 01:44 PM IST
विजयसिंह यांच्या भाजपा प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया  title=

पुणे : विजयसिंह मोहीते पाटील यांनी माढ्यातून लढावे असे शरद पवार यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. मी त्याला साक्षीदार आहे. मात्र मोहीते पाटलांनी दुसऱ्या नावाचा आग्रह धरल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. पुण्यातील मेळाव्यात ते बोलत होते.  मागील 20 वर्षे राष्ट्रवादीमध्ये विविध पदे उपभोगलेले रणजितसिंह यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. जंयत पाटील आणि पवार साहेबांचे पीए हे विजयसिंह मोहीते पाटील यांना फोन करत होते. मात्र शेवटचे दोन दिवस त्यांनी फोन बंद करुन ठेवल्याचा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला. शेकडो समर्थकांसह रणजितसिंह भाजपात दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली होती. रणजितसिंह यांच्यासोबतच धैर्यशील मोहिते पाटील (चुलतभाऊ), माळशिरस पंचायतमधील वैष्णोदेवी मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनीही यावेळी भाजप प्रवेश केला.

विजयसिंह मोहीते पाटील यांना उमेदवारी द्यायचे ठरले होते. त्यांनी उमेवारी घेतली नाही. त्यांनी जे नाव पुढे केले होते त्याला माळशिरस वगळता मतदार संघातून विरोध होता, याचा खुलासाही अजित पवार यांनी यावेळी केला. माढ्यात नवा चेहरा देण्याचा प्रयत्न आहे असून त्यासंदर्भात 23 तारखेला निर्णय होईल असे अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितले.  'विधानपरिषदमध्ये सदस्य असल्यापासून आपलं भाजपबरोबर आपुलकीचे नातं निर्माण झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी सर्व गट-तट बाजुला सारत राज्य प्रगतीपथावर नेले. माढा, सोलापूरमधील विविध प्रश्न सोडवले. रेल्वेचा प्रश्न सोडवला. पासपोर्ट कार्यालयचा प्रश्न सोडवला. आवर्जून सांगायचं म्हणजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे रस्त्यांची कामे झाली... त्यामुळे, मोहिते पाटील राष्ट्वादीत असून कामं कशी होतात? अशी टीकाही आमच्यावर झाली' असं म्हणतानाच 'आम्हाला तुमच्याबरोबर काम करायची संधी दिलीत, तुम्ही सांगाल ते पुढे राजकारण-समाजकारण करू' असं आश्वासनही रणजितसिंह पाटील यांनी यावेळी भाजप नेत्यांना दिले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांचे पक्षात स्वागत केले. 'आज राजकारणातील एक महत्त्वाचा दिवस आहे, महाराष्ट्राचे राजकारण मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होत नाही, ज्यांनी राज्यात ठसा उमटवला, त्याच घराण्यातील तिसरी पिढी युवा नेता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे मोठं घराणं भाजपसोबत जोडत आहे याचा मोठा आनंद आहे' असे म्हणतानाच 'पुढचा माढाचा खासदार भाजपाचाच असेल' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.