हा खेळ पैशांचा! पार्थ पवारांच्या विजयासाठी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न

२४ तासांत पैसे वाटण्याच्या २ घटना उघड

Updated: Apr 28, 2019, 08:17 PM IST
हा खेळ पैशांचा! पार्थ पवारांच्या विजयासाठी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतरही काही उमेदवारांनी मात्र या लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लावल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकींच्या या रिंगणात मताधिक्य मिळवण्यासाठी मतदारांना पैशांचं आमिष दाखवून विकत घेण्याचा सर्रास प्रयत्न केला जात असल्याची बाब उघड झाली आहे. नवी मुंबईत नुकताच याचा प्रत्यय आला. भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईत पनवेल आणि कामोठ्यात जवळपास २४ तासांत मतदारांना पैसे वाटप करण्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. 

शनिवारी घडलेल्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच, रविवारी सुकापूर येथे एका इसमाला पैसे वाटप केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रताप आरेकर नावाचा हा इसम जवळपास २९ पैशानी भरलेली पाकिटं घेऊन ती वाटप करत असल्याचं निदर्शनास आलं ज्यानंतर त्याला ताब्यात घेत भरारी पथकाकडे सोपवण्यात आलं. 

मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या पार्थ पवार यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप केल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला अटक करण्यात आली.  पनवेल शहरातील सुकापूर भागात पैसे वाटताना ही कारवाई करण्यात आली. प्रताप आरेकर असं पैसे वाटणाऱ्याचं नाव आहे. त्याच्याजवळ २९ पाकिटं सापडली. ज्यामध्ये एका पाकिटात दोनशे रुपयांप्रमाणे ५ हजार ८०० रुपये सापडले आहेत. प्रताप हा पार्थ पवारसाठी कार्यरत असल्याची माहिती आहे. तर, शनिवारी ताब्यात घेण्यात आलेले कार्यकर्ते हे शेकापचे असल्याचं कळत आहे. 

शनिवारी काय घडलं होतं? 

शनिवारी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं होतं.  पहिल्या घटनेत कामोठे भागात वैभव पाटील आणि संदीप पराडकर हे दोघं रहिवासी भागात पैसे वाटत असल्याचं शिवसैनिकांच्या लक्षात आलं. प्रत्येक मतदाराला ते ४०० रुपये देत असल्याची स्थानिकांची माहिती समोर आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर शिवसैनिकांनी दोघांनाही पकडलं त्यांच्याकडं मतदारयादी आणि वीस हजारांची रोकड सापडली होती. 

एकंदरच मतदानाच्या अवघ्या काही तासांपूर्वी होणाऱ्या या घटना पाहता लोकशाही राष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या वाटेत अडथळे निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.  देसहितासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या मतांचं मुल्य अशा पद्धतीने लावत हा मतदारांचा अपमान असल्याचीही भावना व्यक्त करण्यात येत आहे.