Ajit Pawar: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदार संघाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. पवार कुटुंब माझ्यासोबत नसलं तरी बारामतीकरांनी माझ्या पाठिशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी बारामतीकरांना केलंय. पण याच बारामतीतून त्यांना भाजपकडून आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकीता पाटील यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे निवडणूक जवळ येत असताना पवार-पाटील संघर्ष पेटण्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा जो उमेदवार असेल त्याचेच काम करावे लागेल असे अजित पवार सातत्याने म्हणत आहेत. त्यांती पत्नी सुनेत्रा पवार यांनाच जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत निर्माण होण्याची शक्यता आहे. ते तुम्हाला भावनिक करतील पण तुम्ही काम बघून मतदान करा, असे आव्हान करत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला. पण आता मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून त्यांना आव्हान मिळू शकते.
ज्यांच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकत भाजपबरोबर घरोबा केलेले इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आम्ही यापूर्वी महाआघाडीत होतो. आता महायुतीत आहोत. आघाडीत असताना तीनीही वेळेस त्यांनी शब्द दिला आणि नंतर फिरवलेला आहे. त्यांनी आमची फसवणूक केली असून आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे जे आमचे विधानसभेला काम करतील त्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू असा इशारा अंकिता ठाकरे पाटील यांनी दिलाय.
तर पुत्र राजवर्धन पाटील यांनी देखील यावेळी महत्वाचे विधान केले आहे. काहींना वाटत असेल की यांना केंद्रीय पद मिळाले आहे. असे असले तरीही 2024 ची विधानसभा आम्ही लढणारच आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात पुन्हा पाटील विरुद्ध पवार असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळणार आहे.