'46 डिग्रीत काम करणारी मी एकमेव खासदार', नवनीत राणांनी विरोधकांना सुनावलं 'माझ्या बापाचं नाव काढता अन्..'

LokSabha: अमरावीतमधून उमेदवारी मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांनी विरोधकांसह बच्चू कडू यांच्या टीकेलाही उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी माझा बाप काढणाऱ्यांना धडा शिकवा असं आवाहनही केलं.  

शिवराज यादव | Updated: Apr 4, 2024, 12:19 PM IST
'46 डिग्रीत काम करणारी मी एकमेव खासदार', नवनीत राणांनी विरोधकांना सुनावलं 'माझ्या बापाचं नाव काढता अन्..'  title=

LokSabha: अमरावीतमधून उमेदवारी मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांसह त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या मित्रपक्षांनाही उत्तर दिलं आहे. माझा बाप काढणाऱ्यांना धडा शिकवा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्म झाला नाही, स्वतःच ताट स्वतः तयार केले असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. तसंच उद्धव ठाकरे घाबरले असल्याने अमरावतीत उमेदवार दिला नाही असंही म्हणाल्या. 

"रवी राणा यांनी आपली पोटतिडकी आज बोलून दाखवली. जिथे जन्म झाला त्यासाठी त्यांची तळमळ दिसत आहे. माझं राजकारण घर भरण्यासाठी नाही. युवकांना रोजगार देणं, बेघरांना छत देणं हे माझं राजकारण आहे. मी शेतकऱ्यांचा आवाज होत आहे. संपत्ती वाढवण्यासाठी मी राजकारण करत नाही," असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. 

"अमरावतीकर माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. मी कधीच मर्यादा सोडून बोललेली नाही आणि ती संस्कृतीही नाही. माझ्या बापाचं नाव काढतात. माझ्या वडिलांनी सीमेवर देशासाठी योगदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर माझे खरे बाप आहेत. त्यांचे विचार घेऊन मैदानात उतरत आहे. माझा बाप काढणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महिला, शेतकरी, शेतमजूर पुढे येतील," असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

"एका बाईवर किती अत्याचार करता. हनुमान चालिसा म्हणते असं म्हटल्याने मला जेलमध्ये टाकलं होतं. आपल्यापेक्ष लहान लोकांना जेलमधये टाकून तुम्ही मोठे होत नाही. बरोबरीच्या व्यक्तीशी लढून दाखवा. माझा सोन्याचा चमचा घेऊन जन्म झाला नाही. स्वतःचं ताट स्वतः तयार केले आहे. माझ्याविरोधात आज उमेदवार उभा करायला घाबरत आहेत. अमरावती पाहिजे असं बोललेही नाही. उद्धव ठाकरे घाबरले असून, दुसऱ्या पक्षाला उमेदवारी दिली," असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

"33 महिन्याच्या सरकारमध्ये टेक्सटाइल कंपनीसाठी प्रस्ताव केला असता उद्धव ठाकरेंनी अमरावतीचं नाव काढून दुसऱ्या जिल्ह्याचं नाव दिलं. 11 हजारांचं टेक्सटाइल पार्क देण्यासाठी मी सरकारकडे विनंती केली आहे. 2 ते 3 लाख बेरोजगारांना यामुळे नोकरी मिळेल," असं नवनीत राणा म्हणाल्या. 

"या क्षेत्रातील मोठे नेते एका बाईबद्दल आपण कोणत्या पातळीवर बोलत आहेत. बाईच्या पोटातून जन्म घेतला आहे याचा तरी विचार करावा," असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंवर निशाणा साधला. अनेक खासदार एसीच्या घरातून बाहेर पडत नाहीत. पण 46 डिग्रीत काम करणारी मी एकमेव खासदार आहे असंही त्या म्हणाल्या. 

तसंच बच्चू कडूंचा उल्लेख न करता त्यांनी माजी सैनिकाच्या मुलीवर पातळी सोडून टीका केली जाते. नवनीत राणांना पाडणार, डिपॉझिट जप्त करणार असं जाहीरपणे बोलतात. पण ईमानदारी माझी ताकद आहे असं त्या म्हणाल्या.