'...आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न'; उद्धव ठाकरेंची भाजपावर घणाघाती टीका, 'महाराष्ट्रात मोदी नव्हे, तर...'

Uddhav Thackeray on MNS-BJP: महाराष्ट्रात मतं हवी असतील तर मोदी नाही तर ठाकरे नावावरच मतं मिळतात हे आता त्यांना समजलं आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच राज ठाकरेंच्या निमित्ताने आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही लगावला आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 19, 2024, 05:15 PM IST
'...आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न'; उद्धव ठाकरेंची भाजपावर घणाघाती टीका, 'महाराष्ट्रात मोदी नव्हे, तर...' title=

Uddhav Thackeray on MNS-BJP: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे जागावाटपावरुन महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेले असताना राज ठाकरेंच्या निमित्ताने नवा पक्ष सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या असून लवकरच युतीसंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली असून आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. 

महाराष्ट्रात मतं हवी असतील तर मोदी नाही तर ठाकरे नावावरच मतं मिळतात हे आता त्यांना समजलं आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ते नांदेडमध्ये आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी समर्थकांना फक्त जल्लोषात राहू नका, तर प्रयत्न करा असा कानमंत्रही दिला. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

"अस्सल बियाणं भाजपातच नाही तर शेतकऱ्यांना काय देणार. यांचं सगळं बियाणं बोगस आहे, सगळी माणसं बाहेरुन घेत आहेत. महाराष्ट्रात मतं हवी असतील तर मोदी नाही तर ठाकरे नावावरच मतं मिळतात हे आता त्यांना समजलं आहे. म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला. आता आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. घेऊन जा, मला फरक पडत नाही. मी आणि माझी जनता समोरासमोर आहोत इतकं पुरेसं आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

दरम्यान यावेळी त्यांनी कार्यकर्ते, समर्थकांना निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. "नुसतं जल्लोषात राहू नका. प्रयत्न केल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही. जमिनिची मशागत केल्याशिवाय पीक येत नाही. तसंच निवडणुकीच्या दिवसापर्यंत सगळ्या विचारांची पेरणी, मोदी सरकारच्या थापा जनतेपर्यंत पोहोचवा. इतकं केल्यानंतर मी प्रचाराला आलो नाही तरी आपला उमेदवार प्रचंड मताने जिंकेल असा विश्वास आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

मनसेला दोन जागा मिळण्याची शक्यता

दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये मनसेला दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे या निवडणुकीतून अमित ठाकरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामागे भाजपाचा आग्रह कारणीभूत ठरु शकतो. 

दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह आहे. राज ठाकरे यांनी मात्र या मागणीवर काय प्रतिक्रिया दिली आहे हे समजू शकलेलं नाही. पण तसं झाल्यास अमित ठाकरे निवडणूक लढताना दिसतील. दरम्यान शिर्डीमधून मनसेचे नेते बाळा नांदगावकर उमेदवार असू शकतील.