महाराष्ट्राचे बदलते राजकारण शरद पवारांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार?

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केलीय. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुण्यातील मोदीबागेतल्या घरी अजूनही इच्छुकांच्या रांगा लागल्यात. महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या इच्छुकांना पवारांच्या पक्षात भवितव्य दिसू लागलंय. मोदी बागेतली गर्दी पाहता पुढचं राजकीय चित्र पवारांसाठी आशादायक असेल असं चित्र निर्माण झालंय. 

वनिता कांबळे | Updated: Oct 15, 2024, 09:57 PM IST
महाराष्ट्राचे बदलते राजकारण शरद पवारांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार? title=

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्राच्या महानिवडणुकीचं रणसंग्रामाला सुरुवात झालीय. निवडणूक जाहीर झालेली असताना पुण्यातल्या मोदीबागेत शरद पवारांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या रांगा काही कमी होत नाहीयेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या करिष्म्यानंतर राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्यासाठी इच्छुकांची संख्या प्रचंड वाढलीये. मुंबईत ठाकरे आणि राऊतांची भेट घेऊन आल्यानंतर रविकांत तुपकरांनी शरद पवारांचीही भेट घेतली. महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं.

अजित पवारांचे खास असलेले विलास लांडे यांनीही शरद पवारांची भेट घेतली. आपण शरद पवारांसोबतच असल्याचं ते सांगायला विसरले नाहीत. शेकापचे जयंत पाटीलही मोदीबागेत पवारांना भेटण्यासाठी आले होते. शेकापच्या जागांवाटपासंदर्भात जयंत पाटलांनी शरद पवारांशी चर्चा केलीच. शिवाय मविआचे काही उमेदवार ठरवण्याबाबतही सल्लामसलत केल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. शरद पवारांच्या पक्षाचं प्रचंड आकर्षण वाढलंय. अनेकांना शरद पवारांच्या पक्षात राजकीय भवितव्य दिसू लागलंय. त्यामुळं पुढचे काही दिवस पवारांच्या मोदीबागेत इच्छुकांची गर्दी कायम राहणार यात शंका नाही.

 विधानसभा निवनडणुकीत पिपाणी चिन्हावर बंदी नसणार आहे.. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणीचा पुन्हा तुतारीला फटका बसण्याची शक्यता आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं चिन्ह हे तुतारी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत पिपाणीमुळे तुतारीला फटका बसल्याची तक्रार शरद पवार गटाने केली होती.. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या होत्या..  नाशिकसह सर्वच जागांवर 4 लाखांहून अधिक मतदान पिपाणीला पडले होते. विशेषतः सातारा लोकसभेत पिपाणी चिन्हामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभवाचेही तोंड पहावे लागले होते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शरद पवार गटाने पिपाणी चिन्ह गोठवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम ठेवलंय.. तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्षष्ट दिसतो, त्याचा आकार वाढवण्यात यावा ही मागणी मात्र आयोगाने मान्य केलीय.