फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; पण 12 दिवस नेमकं काय घडलं? वाचा सत्तानाट्याचा सगळा घटनाक्रम

निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 12 दिवसानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 4, 2024, 09:10 PM IST
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; पण 12 दिवस नेमकं काय घडलं? वाचा सत्तानाट्याचा सगळा घटनाक्रम title=

राजकारणात एक आठवड्याचा वेळ खूप मोठा मानला जातो. मात्र,राजकारणातील प्रत्येक मिथक बदलणाऱ्या भाजपनं ही धारणाही बदलली. निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 12 दिवसानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. गुरूवारी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.  निकालानंतर सत्तानाट्य कसं रंगलंय पाहूयात.

विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याचीच सर्वांना उत्सुकता होती. 132 जागा जिंकत बहुमताच्या जवळपास गेल्यानंतर भाजपनं सत्तास्थापनेसाठी कोणतीच घाई केली नाही. एकदम कासवाच्या गतीनं चाल खेळली. 
भाजपचाच मुख्यमंत्रीपद होणार याबाबत कुणाचंच दुमत नव्हतं. मात्र, मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी कुठंही भाजपनं   उतावळेपणा दाखवला नाही .

- 23 नोव्हेंबरला महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर दुपारपासून मुख्यमंत्री कोण होणार याचीच चर्चा सुरू झाली. निवडणुकीतील विजयाचा जल्लोष उतरल्यानंतर भाजपनं मौनवृत्त धारण केलं. 

- 24 नोव्हेंबरला अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरच्या झालेल्या बैठकीत अजित पवारांची गटनेतेपदी निवड करण्यात आली

- 24 नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या हॉटेल ताज लँडच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड झाली

-26 नोव्हेंबर रोजी तारखेला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच हॉटेल ताज लँड्समधील शिवसेनेच्या आमदारांना घरी जाण्यास सांगितलं.

-26 नोव्हेंबरला राष्ट्रवादीनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास हरकत नसल्याचं जाहीर केलं

- 27 नोव्हेंबर म्हणजेच निकालाच्या चार दिवसानंतर एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी घेतलेला निर्णय मान्य असेल असं जाहीर केलं. सत्तास्थापनेची कोंडी फुटण्यास हळूहूळू सुरूवात झाली.

- 28 नोव्हेंबर रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत खलबतं झाली.  बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा  सुद्धा उपस्थित होते. 

- निकालानंतर प्रत्येक बाजू भक्कम असतानाही निकालाच्या पाच दिवसानंतर भाजपनं सरकार स्थापनेसाठी पहिल्यांदा पाऊल उचललं 

- त्यानंतर दोन दिवस म्हणजेच 29 आणि 30 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा राजकीय हालचालींचा वेग मंदावला होता. 

- 29 नोव्हेंबर दिल्लीहून परत आल्यानंतर एकनाथ शिंदे दरेगावात गेले आणि तिथंच उपचार घेतले. शिंदे गावी गेल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चाही रंगली होती. 
यावेळी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी शांत राहणेच पसंत केले

- 30 नोहेंबर अचानक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचं जाहीर केलं.  मात्र,मुख्यमंत्री कोण होणार? हा पहिल्या दिवसांपासून असलेला सस्पेन्स कायम होता

- 1 डिसेंबर रोजी  4 वाजता दरेगावातून ठाण्याला परतले

- 2 डिसेंबर रोजी भाजपकडून महाराष्ट्रासाठी केंद्रीय निरीक्षकांची घोषणा 

- अखेर 3 डिसेंबर रोजी एकनाथ शिंदे संध्याकाळी मुंबईतल्या वर्षानिवासस्थानी पोहचले त्यानंतर शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीस पोहचले

- 4 डिसेंबर रोजी भाजपच्या विधिमंडळ गटे नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

निकाल लागल्यानंतर 12 दिवसाच्या कालावधीत महायुतीचा विजयाचा शिल्पकार म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र, भाजपनं कासवाच्या गतीनं हे नॅरेटिव्ह संपूर्णपणे बदलून टाकलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंत शिवसेनेच्या एकाही नेत्यानं विरोधाचा राग आवळला नाही. एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी पण दिसून येत नाही. आता मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार असणारे शिंदे यांचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलंय. निकालानंतर बारा दिवसाच्या कालावधीत अगदी नियोजनपूर्वक भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा स्पष्ट संदेश पोहचला आणि देवाभाऊ पुन्हा आले.