Maharashtra Rain Updates : रविवार आणि सोमवारी पावसानं काहीशी उसंत घेतल्यानंतर मुंबईकरांच्या दैनंदिन कामाला चांगलाच वेग आला होता. पण, मंगळवारी पहाटेपासूनच शहराच्या विविध भागांमध्ये पावसानं जोर धरला आणि पुन्हा एकदा मायानगरी ओलीचिंब झाली. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार या आठवड्याभरात पावसाची अशीच परिस्थिती असून, सध्यातरी नागरिकांना लख्ख सूर्यप्रकाश पाहता येणार नाही.
हवामान विभागानं सध्या मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोबतच ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसह सिंधुदुर्गातही ऑरेंज अलर्ट देत नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे. ठाण्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तुरळक सरी बसण्याचा अंदाज आहे. तर, कोकणात मात्र तो मुसळधार बरसणार आहे. साताऱ्याचा घाट परिसर, कोल्हापूर या भागांसाठी गुरुवारपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम असेल.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या घाटमाध्यावरील परिसरातही पावसाची जोरदार हजेरी असेल. त्यामुळं कोल्हापूर, सातारा, पाचगणीमध्ये घाट रस्त्यानं प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी.
पुणे वेधशाळेचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं असून, पुढच्या 48 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या काही तासांच पावसाचा जोरही वाढू शकतो.
२४/७, कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात आज संध्याकाळी तयार. पुढच्या 48 तासात अजून तीव्र होण्याची शक्यता. WNW; म्हणजे आत मध्ये ते सरकणार.
Watch for IMD updates. https://t.co/JqNB0q0oy6— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 24, 2023
सोमवारी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर मध्यरात्रीपासून नदीची पाणी पातळी स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. सोमवारी सकाळी कोल्हापूरात पावसानं काहीशी उसंत घेतल्यामुळं नद्यांच्या पाणी पातळीत मध्यरात्रीपासून कोणतेही वाढ झाली नाही. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 4 उंच इतकी आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे. असं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने 2019 आणि 2021 चा पुराचा फटका बसलेल्या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याची सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, तिथे पानशेत आणि वरसगावसह मुठा खोर्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे खडकवासला धरणात सोमवारी सायंकाळी पाच वाजता 81.43 टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे सायंकाळी सातपासून धरणातून मुठा कालव्यात विसर्ग सुरू करण्यात आला. दिवसअखेर खडकवासला धरणसाखळीत 17.21 टीएमसी (59.03 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.
खडकवासला धरण मंगळवारी (दि. 25) शंभर टक्के भरल्यास मुठा कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.