अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला फायदा नाही. बुलेट ट्रेन हा विचार न करता घेतलेला निर्णय असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार रविवारी नगर दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी हे विधान केले. एकूण विचार करता बुलेट ट्रेनचा उपयोग महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच अधिक होणार आहे. असे असतानादेखील गुजरातच्या बरोबरीने खर्चाचा समान वाटा महाराष्ट्र उचलत आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडेल, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी स्विकारलाच कसा, असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. या प्रश्नासोबतच पवार यांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. पवार म्हणतात, बुलेट ट्रेनपेक्षा हा मोठा निधी सध्याच्या रेल्वेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, चंद्रपूर-मुंबई रेल्वेसाठी किंवा पाटबंधाऱ्यांसाठी वापरला असता तर ते अधिक फायद्याचे ठरले असते.
दरम्यान, या वेळी बोलताना पवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारले चांगलेच फटकारले. पवार म्हणाले, भाजपची कर्जमाफी म्हणजे केवळ ‘लबाडाचं आवताण आहे’. सरकारने कर्जमाफीचे अश्वासन दिले. पण, ती कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीतील अश्वासनातील संपूर्ण हा शब्द आता गेला आहे. दररोज नवनवे आदेश काढले जात आहेत. अनेक किचकट आणि जाचक अटी टाकल्या जात आहेत. त्यामुळे सरकारच्या या बदलत्या निर्णय आणि धोरणामुळे जिरायत आणि लहान शेतकरी वैतागला असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.