Maharashtra Weather News : साधारण मागील आठवड्याभरापासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं उसंत घेतलेली नाही. इथं मुंबई आणि उपनगरांमध्येही सूर्यनारायणानं दर्शन दिलं नसून, येत्या 24 तासांमध्येतरी हे चित्र फारसं बदलणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मुंबईत पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगत शहरासह उपनगरांमध्येही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरातील काही भागांमध्ये पाऊस अडचणी वाढवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातल्या 4 तालुक्यात आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जत तालुक्यात आज शाळा, कॉलेजेस बंद असतील. रायगड जिल्ह्यात हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळं त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली.
मुंबई - यलो
ठाणे - यलो
रायगड - ऑरेंज
रत्नागिरी - ऑरेंज
पुणे - यलो
सातारा - ऑरेंज
अकोला - यलो
अमरावती - यलो
भंडारा - ऑरेंज
गोंदीया - यलो
गडचिरोली - यलो
चंद्रपूर - यलो
नागपूर -यलो
हवामान खात्याच्या माहितीनुसार नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता येथील सर्व शैक्षणिक संस्था प्रशासकीय कार्यालयं आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयांना आज (22 जुलै 2024) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापूरात पंचगंगा नदीची रविवारी रात्रीपासून संथ गतीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु असल्यामुळं जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पंचगंगेची पाणीपातळी 38 फुट 8 इंचावर असून, नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट असून सध्या जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेले असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून, राधानगरी धरण 80% भरल्याने प्रतीसेकंद 1450 क्यूसेक पाण्यचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तिथं कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप सुरु असतानाच पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या पात्राबाहेर पडल्याने वाहतूक विस्कळी झालीय. ही एकंदर परिस्थिती पाहता शिवाजी विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगिती, नवीन तारखा लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. शाळा देखील तेथील परिस्थिती बघून सुरू ठेवण्याच्या किंवा बंद करण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
बंगालच्या उपसागरारत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुशळे विदर्भापासून कोकणापर्यंत पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. येत्या काळात हा कमी दाबाचा पट्टा निवळणार असून, पावसाचा जोरही कमी होताना दिसणार आहे.