Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मान्सून आणखी प्रभावीरित्या सक्रिय होणार असून, त्याचे थेट परिणाम दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये दिसणार आहेत. पावसाच्या याच अंदाजाच्या धर्तीवर दक्षिण कोकणात ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. इथं तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रासह उत्तर कोकणातही दमदार पावसाच्या हजेरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
फक्त कोकणतच नव्हे, तर विदर्भापर्यंत मान्सूनची समधानकारक हजेरी पाहायला मिळणार असून, मराठवाड्याला सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. इथं ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून, वादळी पावसाची शक्यता आहे. तर, विदर्भात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळेल. तर, शहरातील काही भागांमध्ये अधूनमधून पाऊस उघडीप देताना दिसणार आहे.
सध्याच्या घडीला अरबी समुद्रामध्ये ढगांची दाटी झाली असून, त्यामुळं राज्यातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या मध्य गुजरात आणि नजीकच्या भागामध्ये समुद्रसपाटीपासून काही उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळं कमाल तापमानात घटही नोंदवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील पावसाच्या एकंदर हालचाली पाहता पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सध्या हवामानाची काहीशी हीच स्थिती पाहायला मिळत आहे. IMD च्या माहितीनुसार सध्याच्या घडीला दक्षिण पश्चिम मान्सून उत्तर अरबी समुद्रातून देशाच्या पश्चिमेसह मध्य आणि पूर्व भागांमध्ये पश्चिमोत्तर दिशेलाही पुढं जात आहे. ज्यामुळं उत्तर प्रदेशात मान्सूनसाठी पूरक परिस्थिती पाहायला मिळत आहे. हवमान आणि मान्सून वाऱ्यांची ही रचना पाहता, तामिळनाडू, कर्नाटक, पुद्दुचेरी, कराईकल, आसाम, मेघालय, ओडिशा, बिहार, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालची हिमालयाची रांग आणि गोव्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.