Maharashtra Weather News : महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसह सप्टेंबर महिन्याच्या काही दिवसांमध्ये धुमाकूळ घालणारा पाऊस आता राज्यातून काढता पाय घेताना दिसत आहे. पण, परतीच्या प्रवासादरम्यानही राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. एकिकडे उष्णता वाढत असतानाच दुसरीकडे मात्र राज्यात परतीच्या पावसामुळं त्रेधातिरपीट उडत असल्याचंही चित्र आहे.
पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, यादरम्यान विजांचा कडकडाटही होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान या साऱ्यामध्ये होणारा उष्णतेचा मारा मात्र पाठ सोडताना दिसणार नाही. मागील 48 तासांपासून राज्यात पावसाच्या परतीसाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं आता जवळपास अर्ध्याहून अधिक राज्यातून मान्सूननं माघार घेतल्याचं चित्र आहे.
कोकण किनारपट्टी क्षेत्रासह मुंबई आणि ठाणे, पालघर भागांमध्ये या परतीच्या पावसामुळं हवामानात मोठे बदल दिसत आहेत. इथं तापमानातील दाह वाढला असून, हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळं उष्मा अपेक्षेहून अधिक जाणवत आहे. तर, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसानं माघार घेतली असून, पहाटेच्या वेळी धुक्यासह गारवा अनेक जिल्ह्यांणध्ये येणाऱ्या थंडीची चाहूल देऊन जात आहे. मात्र सूर्य डोक्यावर येताना मात्र हा गारवा उकाड्यामध्ये रुपांतरित होऊन नागरिकांना घाम फोडताना दिसत आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळणार असल्यामुळं आरोग्याची काळजी घेण्याचा इशारा तज्ज्ञ मंडळी देत आहेत.