Chagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमधला वाद शमायला तयार नाही. छगन भुजबळ यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे.
समता परिषदेच्या बैठकीत भुजबळांनी पुन्हा एकदा जरागेंवर निशाणा साधला आहे. 100 एकर शेती साफ करून सभेसाठी मैदान तयार करत आहेत. मात्र, यासाठी सात जमवलेले सात कोटी रुपये आले कुठून असा सवाल भुजबळांनी बैठकीत उपस्थित केला. या बैठकीतल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र ओबीसीतून आरक्षण कदापी मान्य नसल्याची भूमिका पुन्हा एकदा भुजबळांनी मांडलीय. तर, 123 गावांनी मराठा समाजासाठी पैसा गोळा केल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय.
मुंबईत मराठा समाजाचा गनिमी कावा पाहायला मिळाला. आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा एक गट मुख्यमंत्र्यांच्या वर्षाकडे कूच करताना दिसला. मराठा क्रांती मोर्चानं आरक्षणासाठी गिरगावपासून मोर्चा काढला.. मोर्चाला पोलिसांनी व्हिविंग डेकपर्यंतच मोर्चाला परवानगी दिली होती. मात्र तरीही मोर्चा वर्षा निवासस्थानाकडे जाऊ लागला.. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं जाणार असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानुसार गिरगाव चौपाटी परिसरात अचानक मराठा बांधव जमायला सुरुवात झाली. गिरगाव चौपाटीपासून मराठा बांधवांचे जथ्थेच्या जथ्थे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानाकडे कूच करु लागले. गिरगाव येथील शहीद तुकाराम ओंबळे चौक ते व्हिविंग डेकपर्यंत मोर्चाला परवानगी होती. मात्र, त्यापुढे जाण्याचा प्रयत्न एक गट करु लागला. मरिन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी नाकेबंदी करत मोर्चाला अडवलं. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. गनिमी काव्याने वर्षा बंगल्यावर जाणार असा इशारा दिला.
जरांगे पाटलांनी कुणबी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी केलीय. तर मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या अशी मागणी मुंबईत करण्यात आली. जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत 14 ऑक्टोबरला संपतेय. म्हणजे काही तासात ही मुदत संपतेय. त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. गनिमी काव्यानं थेट मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आता पुढच्या काही तासात सरकार आरक्षणावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.