'त्याला भेटल्यावर...', फडणवीसांची बाजू घेणाऱ्या नितेश राणेंसहीत BJP नेत्यांना जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange Patil Slams BJP Leaders: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवल्यानंतर मनोज जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 1, 2023, 10:27 AM IST
'त्याला भेटल्यावर...', फडणवीसांची बाजू घेणाऱ्या नितेश राणेंसहीत BJP नेत्यांना जरांगेंचा थेट इशारा title=
जरांगे पाटील यांना पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारला

Manoj Jarange Patil Slams BJP Leaders: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत असलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी जरांगेनी आंदोलनाच्या आडून राजकीय वक्तव्य करु नयेत असं म्हटलं आहे. तर नितेश राणेंनी मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे असा सवाल उपस्थित केला आहे. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना बुधवारी सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जरांगे पाटलांनी कठोर शब्दांमध्ये नितेश राणेंवर निशाणा साधला आहे.

भाजपा नेत्यांना फटकारलं...

ज्या फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं त्यांच्यावर जरांगे टीका करत आहेत असं प्रसाद लाड म्हणालेत. तर नितेश राणेंनी जरांगेंना नेमकं कोण हे लिहून देत आहे? असा सवाल उपस्थित केल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला. या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी, "आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. काल माझ्याशी फोन करुन गोडगोड बोलतात. पण आता याच्यापुढे बोलू नका," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यानंतर पत्रकारांनी प्रसाद लाड यांनी तुमचा बोलवता धनी कोण आहे असा प्रश्न विचारल्याचं पत्रकाराने सांगितलं. यावर संतापलेल्या स्वरात जरांगे पाटलांनी, "त्याला भेटल्यावर सांगतो मी बोलवता धनी कोण आहे आणि काय आहे," असं उत्तर दिलं. 

नक्की वाचा >> संतापलेल्या जरांगेंचा थेट मोदी-शाहांना इशारा; फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, 'असं वागल्यावर...'

...तर पाणी त्याग करणार

जरांगे पाटील यांनी पोलीस आणि प्रशासनाकडून शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना उचलून नेलं जात आहे असं म्हणत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. मराठा समाजातील तरुण शांतते आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्यांचेच लोक घुसवून हिंसाचार घडवून आणत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. मुंबईमध्ये होत असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीसंदर्भात बोलताना जरांगे पाटलांनी, दुसऱ्यांदा ही बैठक होत आहे. मात्र आम्हाला पूर्णपणे आणि सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण मिळल्याशिवाय आम्ही आंदोलनावरुन उठणार नाही. सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली आहे. तसेच आज संध्याकळपर्यंत काही निर्णय झाला नाही तर आपण पाणीही सोडणार असल्याचं जरांगेनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना म्हटलं आहे. अधिवेशनाची घोषणा केली नाही, मराठ्यांना सरसकट सर्वांना ओबीसीमध्ये समावेश करण्याची घोषणा केली नाही तर मी जलत्याग करणार आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय'; जरांगेंचा फडणवीसांना टोला! म्हणाले, 'बांगड्या भरल्यागत चाळे...'

दगाफटका करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा डाव असू शकतो

इंटरनेट बंद केल्यास लोकांची काय चुकी आहे? उपमुख्यमंत्री जाणूनबुजून नेट बंद करतात. बीडमध्ये आंदोलन करणाऱ्या गोरगरीबांच्या पोरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतात. लोकांचा काय दोष आहे? त्यांना वाटू शकतं आपल्या माणसाला उचलून नेतात की काय? आपल्या माणसाबरोबर दगाफटका होतो की काय? उपमुख्यमंत्र्याचा डाव असू शकतो दगाफटका करण्याचा. मोठा आरोप तर मोठा आरोप. गंभीर आरोप तर गंभीर आरोप. असा समज आहे समाजाचा. आम्ही घाबरत नाही त्याला, असंही जरांगे पाटील म्हणाले.