'मराठा समाजाला...', आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा थेट शरद पवारांना सवाल; म्हणाल्या 'त्यांची भूमिका..'

Maratha Reservation Pankaja Munde Question To Sharad Pawar: पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा फटका मतपेटीमधून बसल्याची चर्चा निकालानंतर रंगली होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 29, 2024, 02:45 PM IST
'मराठा समाजाला...', आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा थेट शरद पवारांना सवाल; म्हणाल्या 'त्यांची भूमिका..' title=
शरद पवारांना पंकजा यांचा सवाल

Maratha Reservation Pankaja Munde Question To Sharad Pawar: महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता विधान परिषदेच्या नवनियुक्त आमदार तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना मराठा आरक्षणावरुन एकच प्रश्न विचारला आहे. मागील बऱ्याच काळापासून शरद पवारांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अनेक नेत्यांकडून केली जात असतानाच शरद पवारांचा उल्लेख करत पंकजा मुंडेंनी त्यांना याच विषयावरुन एक प्रश्न विचारला आहे. 

पंकजा यांना मराठा आंदोलनाचा फटका बसल्याची चर्चा

पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघामध्ये लोकसभेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका बसल्याची चांगलीच चर्चा रंगली. अनेकदा यासंदर्भात प्रत्यक्षात अप्रत्यक्षात वेगवेगळी विधानं करण्यात आली. असं असतानाच आता थेट पंकजा मुंडेंनी मराठी आरक्षणावरुन आपली शरद पवारांना सवाल केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे. यासाठी जरांगेंनी आता थेट निवडणुकीमध्ये उतरण्यासंदर्भातील चाचपणी सुरु केली आहे.

पंकजा मुंडेंचा सवाल काय?

दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास अनेक ओबीसी नेते विरोध करत आहेत. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटलांकडून सग्या सोयऱ्यांनाही आरक्षणाअंतर्गत घ्यावे अशी मागणी केली जात असताना या मागणीलाही ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासहीत राज्यातील नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे यावर आपली भूमिका मांडली आहे. आता या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात पंकजा मुंडेंनी शरद पवारांना एक सवाल केला आहे. "मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका काय?" असा सवाल पंकजा मुंडेंचा शरद पवारांना विचारला आहे. हा सवाल विचारतानाच पंकजा मुंडेंनी, "शरद पवार मोठे नेते, त्यांची भूमिका महत्त्वाची आहे," असंही पंकजा मुंडे म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> जागावाटपाआधीच अजित पवारांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा! ना पक्षाध्यक्ष, ना भुजबळ 'या' व्यक्तीची वर्णी

...तर शरद पवारांना काळे झेंडे दाखवणार

दरम्यान, शरद पवार यांच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्यापूर्वी त्यांनी आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. 3 ऑगस्ट रोजी शरद पवार शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनसाठी पंढरपूरमध्ये येत आहेत. त्यापूर्वी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे की न द्यावे याबाबत सांगावे, असं ओबीसी संघटनांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी त्यापूर्वी भूमिका स्पष्ट केली नाही तर त्यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवणार, असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला आहे.