मराठ्यांची नाराजी शिंदे-फडणवीसांना परवडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा... संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार

Maratha Reservation : मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवालीत सराटीत आलेत. जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज संध्याकाळी जरांगे आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहेत. खबरदारीसाठी जालना, संभाजीनगरमधील इंटरनेट आणि एसटी सेवा बंद करण्यात आलीय. 

राजीव कासले | Updated: Feb 26, 2024, 02:15 PM IST
मराठ्यांची नाराजी शिंदे-फडणवीसांना परवडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा... संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार title=

Maratha Reservation : मनोज जरांगे आज संध्याकाळी आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत. लोकांना त्रास होऊ नये म्हणून मागे आलोय, लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, कुणीही कितीही दबाव आणला तरी मागे हटणार नाही असा इशारा जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आज अधिवेशनात सगेसोयरेची अंमलबजावणी करा अशी विनंती जरांगेंनी केलीय. शिंदे, फडणवीसांनी मराठ्यांची नाराजी ओढावून घेऊ नये. मराठ्यांची नाराजी शिंदे (CM Eknath Shinde), फडणवीसांना (Devendra Fadanvis) परवडणार नाही, असा इशाराही जरांगेंनी दिलाय.

भाजपाचा जरांगेंवर हल्लाबोल
जरांगेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानं भाजप नेत्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय. जरांगेंची स्क्रिप्ट कुणाची? हे काळ समोर आणेलच असं शेलारांनी म्हटलंय. तर जरांगेंची नौटंकी कुणाच्या बोलण्यावर चाललीय हे अखंड महाराष्ट्राला माहितीय. यामागे पवारांचा हात असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय. तर जरांगेंचा आवाज तुतारीतून तर निघत नाही ना अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केलीये.

संजय राऊत यांचा निशाणा
जरांगेंच्या उपोषणावरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केलेल्या आरोपांवर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. जरांगेंचा बोलावता धनी कोण आहे हे फडणवीसांनी शोधावं. फोन टॅप करणा-या रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगचा अनुभव आहे. त्यामुळे फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का...? हे तपासावं असं आव्हान राऊतांनी दिलंय. तर याचा अर्थ टोपी फिट बसलीय असं म्हणत शेलारांनी राऊतांना टोला लगावलाय

छगन भुजबळ यांची उपरोधिक टीका
ओबीसी नेते छगन भुजबळांनी मनोज जरांगेंच्या भूमिकेवर उपरोधिक टीका केलीये. दोन जुन्या नाटकांचा अभ्यास सुरु आहे. त्यामुळे जरांगेंवर बोलण्यासाठी वेळ नाही असं म्हणत त्यांनी जरांगेंवर ही टीका केलीये. जरांगेंनी मंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यांची चौकशी केली जाणार आहे. संविधानिक पदावर बसलेल्या नेत्यांचा जरांगेंनी अवमान केलाय. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते पोलीस करतील, असा इशारा शंभूराज देसाईंनी जरांगेंना दिलाय...

विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका
मनोज जरांगेंचा बोलावता धनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार तर नाहीत ना...? अशी शंका अंबादास दानवेंनी उपस्थित केलीय. जरांगे फक्त फडणवीसांबद्दलच का बोलतायत याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केलीय. जरांगेंचा मुद्दा पुन्हा समोर येण्याचं कारण काय? असा सवाल बाळासाहेब थोरातांनी सरकारला विचारलाय. आधी गुलाल उधळला मग आता एवढं काय बिघडलं? असंही थोरातांनी म्हटलंय. जरांगेंवरुन विरोधकांवर होणाऱ्या आरोपांत तथ्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं. जरांगे प्रकरण हे मॅच फिक्सिंग आहे का?असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. जरांगेंनी एक पाऊल पुढे का टाकलं?'सत्ताधारी-जरांगेत काय चर्चा झाली ते उघड करा' अशी मागणी विजय वडेट्टिवारांनी केलीय. 

संचारबंदी, इंटरनेट बंद
मनोज जरांगेंच्याआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनानं काढलेत. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणारेय. जालना, बीड, संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद सेवा बंद करण्यात आलीय.  मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्याचा हा निर्णय घेण्यात आलाय. खबरदारीचां उपाय म्हणून दुपारी 4 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. 

मराठा आंदोलकांनी बस पेटवली?
मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेत. घनसावंगी तालक्यातील तीर्थपुरीत मराठा आंदोलकांनी एसटी बस  पेटवल्याचा आरोप करण्यात आलाय.   शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मराठा आंदोलकांनी आक्रमक होत बस पेटवल्याची माहिती मिळतेय.