अमर काणे, झी मीडिया, अमरावती : लग्न कुणी कुठे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. जगात कुणी हिमशिखरावर, कुणी विमानात, तर कुणी महासागराच्या तळाशी जाऊन लग्नाच्या रेशीमगाठी बांधतात. मात्र, अमरावतीत यापेक्षाही एक अनोखा विवाह सोहळा शुक्रवारी रंगणार आहे.
वराचे नाव - निखिल अरुण तिखे
वधुचे नाव - पूजा लंगडे
विवाहस्थळ - महावितरण कार्यालयासमोरील उपोषण मंडप, अमरावती
एका लग्नाची ही अनोखी गोष्ट. निखिल तिखे या वीज कर्मचाऱ्याचं लग्न १९ जुलैला करण्याचं ठरलं होतं. दरम्यान महावितरणचे सात कर्मचारी बदली प्रक्रियेत झालेल्या अन्यायाला वाचा फोडत ९ जुलैपासून उपोषणाला बसले. त्यातलाच एक निखिल. आता उपोषण लांबल्यामुळं त्याला घरी किंवा मंडपात जाणं शक्य नाही. त्यामुळं उपोषणाच्या ठिकाणीच त्याचं शुभमंगल करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला. उपोषण मंडपातच त्याला हळद लावण्यात आली आणि शुक्रवारी याच मंडपात त्याचे दोनाचे चार होणार आहेत.
निखिल यांची होणारी पत्नी पूजा लंगडे आणि तिच्या कुटुंबीयांनीदेखील अशा प्रकारे लग्न करायला संमती दिली. मात्र त्याच्यावर ही वेळ आणणाऱ्या महावितरणच्या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला.
उदया होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी उपोषणकर्त्यांनी खास निमंत्रण पत्रिका तयार केली असून त्यामध्ये मुख्य अभियंता, उप महाव्यवस्थापक, झोन कार्यालय यांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा साजरा होणार असल्याचं छापण्यात आलंय. तर जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते, शासकीय अधिकारी, पोलीस आयुक्त, यांनाही निमंत्रण पाठविण्यात आलंय. आता महावितरणकडून किमान आहेर म्हणून तरी या उपोषणकर्त्यांची दखल घेतली जाते की त्यांना महावितरणकडून काही वेगळा घरचा आहेर मिळतो, याची उत्सुकता आहे.