Uddhav Thackeray: उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या उद्धव ठाकरे यांची भेट घेत चंद्रकांत पाटील यांनी त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे माझी जीवनगाथा हे पुस्तक भेट दिले आहे. या पुस्तकात एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो, असा उल्लेख आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी आगळ्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे.
महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर चौफेर टीका केली जात होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर राज्यभरात त्यांच्यावर टीका केली जात होती. याप्रकरणी त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफीदेखील मागितली.
उद्धव ठाकरे यांची टीका
मुंबईत महाविकास आघाडीच्या महामोर्चात बोलताना उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. "छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. फुले दाम्पत्य नसते, तर आपण कोठे असतो, हे एका मंत्र्याने भीक शब्द वापरून दाखवून दिलं आहे," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत प्रबोधनकार ठाकरे यांचे माझी जीवनगाथा हे पुस्तक भेट दिलं आहे. या पुस्तकातील उल्लेख देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना वाचून दाखवला. त्यामुळे आपण जे म्हटलो आहे ते बरोबरच होते असे दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी यानिमित्ताने केला आहे. यावेळी विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे, आमदार प्रविण दरेकर हे देखील उपस्थित होते.