पैसे देऊन बलात्कार सुरु आहे, राज ठाकरेंचा गंभीर आरोप; 'महाराष्ट्रात जे सर्वोत्तम आहे ते सगळं....'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली असून, महाराष्ट्रातील नागरिकांना त्या न विकण्याचं आवाहन केलं आहे. ते अलिबागमध्ये आयोजित जमीन परिषदेत बोलत होते.   

शिवराज यादव | Updated: Jan 15, 2024, 12:43 PM IST
पैसे देऊन बलात्कार सुरु आहे, राज ठाकरेंचा गंभीर आरोप; 'महाराष्ट्रात जे सर्वोत्तम आहे ते सगळं....' title=

जे जे महाराष्ट्रातील उत्तम आहे, ते सर्व बाजूंनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. पैसे देऊन बलात्कार सुरु आहे अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी बाहेरुन येणाऱ्या परप्रांतीय नागरिकांमुळे होणारे धोके आताच समजून घ्या असं सांगत चालाखीने पावलं टाकण्याचं आवाहन केलं आहे. जर तुम्हाला आता भान नसेल तर हातातील सगळं निघून जाईल. यानंतर फक्त पश्चातापाचं हात मारणं याशिवाय काही नसेल असा इशाराही त्यांनी दिला. 

"बाहेरचे लोक किती हुशारीने राज्यात घुसत आहेत आणि आपण किती भोळसटपणे वागत आहोत याचा नीट विचार करा. महाराष्ट्रावर हे आक्रमण सुरु आहे. तुमच्या पायाखालील जमीन निघून चालली आहे. याचा मराठी माणसाला अंदाज आहे का?इतर राज्यातील नेते अलर्ट असतात. ते आपल्या माणसांचा प्रथम विचार करतात. पण आपल्याकडे ते होत नाही. अलिबाग आणि आसपासची काही गावं संपली असल्याचं अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. जर तुमच्या पायाखाली हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कोणतेही नागरिक नाही," असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले की, "प्रत्येकाला पैशांची गरज आहे, मुलांचं शिक्षण वैगेरे गरजा आहेत याची मला कल्पना आहे. ती तुमची वैयक्तित संपत्ती असून, ती विकावी की नाही हा तुमचा प्रश्न आहे. पण विकल्यानंतर ती कोणच्या खिशात जात आहे? त्याचा योग्य मोबदला मिळतो का? हेदेखील नीट पाहिलं पाहिजे. बरं ते दलालही मराठी असतात". 

"जगातील कोणताही इतिहास जमिनिशिवाय नाही. आज दुबईत गेलात आणि व्यवसाय करायचा ठरवला तर तेथील अरब व्यक्तीला पार्टनर करुन घ्यावं लागतं. उद्या अलिबागमध्ये व्यवसाय येणार असेल तर तुम्ही का भागीदारी का मागत नाही? तुमच्या पुढील पिढ्यांचा प्रश्नच मिटेल. महाराष्ट्रातील आपल्या लोकांना याचं भानच नाही. तुम्ही जमिनींचं रजिस्ट्रेशन होतं तिथे जाऊन पाहू शकता. नेरळ माथेरानच्या डोंगराखाली प्रकल्प उभे राहत आहेत. तिथे मराठी लोक आहेत का जाऊन पाहा. कर्जत, खालापूर हा सगळा पट्टा हातातून जात आहे. मनसैंनिकांनी अलर्ट राहिलं पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले. 

"बाहेरचे येऊन तुमच्या जमिनी घेऊन तुम्हाला पोरकं करत आहेत. तुमच्या हातात योग्य मोबदला देत नाहीत. तुम्हाला पोखरत आहेत. जमीन भुसभुशीत असली तरच घुशी होतात, खडकाळ भागात घुशी होत नाहीत. ठाणे, रत्नागिरी सगळीकडे ही समस्या आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे झाल्यानंतर भाव आला आणि लोक जमिनी विकत गेले. ते ज्या शांतपणे पोखरत आहेत, आपण तितक्या शांतपणे वाचवलं पाहिजे," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. 

"ठाण्यात सर्वाधिक बाहेरुन येणारे लोक आहेत. रायगड जिल्ह्यात 1 आणि ठाण्यात 7 महानगपालिका आहेत. बाहेरुन जे मोठ्या संख्येने लोक येत आहेत त्यामुळे लोकसंख्या वाढत चालली आहे. जर तुम्हाला आता भान नसेल तर हातातील सगळं निघून जाईल. यानंतर फक्त कपाळावर पश्चातापाचं हात मारणं याशिवाय काही नसेल.  इतर पक्षांचे व्यवहार ठरले असल्याने ते तुम्हाला सांगणार नाहीत. रायगड जिल्ह्यात मराठी उद्योजक येत असतील तर त्यांना उभं करा. आपण आपल्या पायावर दगड मारुन घेऊ नका. आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. पण पुढील 4 ते 5 वर्षात ती परिस्थिती निर्माण होऊ शकते. राज्यासाठी जे करता येतील त्या सर्व गोष्टी चालाखीने कराव्यात," असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. कुंपणच शेत खात असल्याने राज्यकर्त्यांना, नेत्यांना सांगण्यात काही अर्थ नाही असंही ते यावेळी म्हणाले.