आधी 'मातोश्री' मग 'वर्षा'... मध्यरात्रीनंतर अंबानी ठाकरे-शिंदेंना घरी जाऊन भेटले; चर्चांना उधाण!

Ambani Meet CM And Ex-CM Back To Back: मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुकेश अंबानी अचानक 'मातोश्री' या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर ते रात्री एकच्या आसपास 'वर्षा' बंगल्यावर गेले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 2, 2024, 11:50 AM IST
आधी 'मातोश्री' मग 'वर्षा'... मध्यरात्रीनंतर अंबानी ठाकरे-शिंदेंना घरी जाऊन भेटले; चर्चांना उधाण! title=
एकाच रात्री दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी (फोटो प्रातिनिधिक)

Ambani Meet CM And Ex-CM Back To Back: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानींनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मंगळवारी रात्री 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीनंतर लगेच त्यांनी 'वर्षा' निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. रात्री एक वाजता मुकेश अंबानी वर्षा निवसस्थानी पोहोचले होते. त्यामुळेच या भेटीमागील नेमकं कारण काय याबद्दल उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. 

रात्री साडेदहाला 'मातोश्री'वर पोहोचले

मुकेश अंबानी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी पोहोचले. त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर सुमारे दोन तास चर्चा केली. रात्री साडेदहा ते साडेबारा दरम्यान मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र अनंत अंबानी 'मातोश्री' निवासस्थानावर होते. दोन तासांनंतर अंबानींचा ताफा 'मातोश्री' या निवासस्थानावरुन बाहेर पडले. या भेटीदरम्यान राजकीय क्षेत्रात सक्रीय नसलेले तेजस ठाकरेही उपस्थित होते अशी माहिती समोर येत आहे. 

'मातोश्री'वरुन 'वर्षा'वर

तसेच या भेटीनंतर अंबानींचा ताफा थेट 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यासाठी गेला. या दोघांच्या भेटीदरम्यान अंबानींनी नेमकी काय आणि कोणत्या विषयावर चर्चा केली यासंदर्भातील माहिती समोर आली असून ती अजून गुलदस्त्यातच आहे. 'वर्षा' निवासस्थानीही अंबानी पिता-पुत्र बराच वेळ होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केल्याचे समजते. मात्र नेमकी कशावर चर्चा झाली हे सांगण्यात आलेलं नाही.

एका रात्रीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट

एका रात्रीत अंबानींनी दोन प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्याने राज्यात काही मोठी राजकीय घडामोड घडणार की काय यासंदर्भात दबक्या आवाजामध्ये राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. मात्र अंबानींनी उद्धव ठाकरेंबरोबर तसेच त्यानंतर एकनाथ शिंदेंबरोबर झालेल्या वेगळ्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे स्पष्ट झालेलं नाही. 

भेटीचं कारण काय?

ही गाठभेट नेमकी का झाली? यामागे काही व्यवसायिक कारण आहे का? किंवा एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण अथवा एखाद्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ते या दोन्ही नेत्यांच्या भेटीसाठी गेले होते का याबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. 

पवारांच्या त्या भेटीनंतर सत्तापालट झालेला

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मध्यंतरी एका बड्या उद्योगपतीची भेट घेतल्यानंतर राज्यामध्ये सत्तापालट झाला होता. त्यामुळे आता अंबानी यांनी माजी आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांची अगदी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ध्या तासाच्या फरकाने भेट घेतल्याने काही घडामोडी आगामी काळात घडणार का याबद्दलची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.