मुंबई : राज्यातील महत्वाच्या अशा समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पासोबतच प्रस्तावित असलेल्या 736 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन मार्गाचे सर्वेक्षण 12 मार्चपासून सुरू झाले आहे. विमानात लिडार (Lidar — Light Detection and Ranging) बसवून त्यामाध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. बुलेट मार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामाला साधारण 4 महिने लागू शकतात. बुलेट मार्गाच्या सर्वेक्षणासोबतच डीपीआरचेही काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
देशात बुलेट ट्रेनचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केली आहे. मुंबई - अहमदाबाद हा देशातील पहिला प्रत्यक्ष सुरू झालेला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. त्यानंतर 7 ट्रेनचे मार्ग प्रस्तावित आहेत. त्यात मुंबई-नाशिक- नागपूर या मार्गाचाही सामावेश आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गाला लागून तयार करावा असे निश्चित झाले आहे.
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मार्गावरील गावांची नावे जाहीर केली आहेत. यात खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर या शहरांचा समावेश आहे.
रडार तंत्रज्ञानाप्रमाणे लिडार तंत्रज्ञानचे काम असते. मुंबई नागपूर मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लि़डार यंत्र विमानात इन्सॉल करण्यात आले आहे. मुंबई-नागपूर मार्गाचे सर्वेक्षण लिडार तंत्रज्ञानाने होत आहे. लि़डर यंत्र 100 मेगापिक्सेल कॅमेऱ्याच्या सहकार्याने जागेचे चित्रीकरण करणार आहे. त्यानुसार जागेवरील झाडे, रस्ते, पायवाटा, टेकड्या, पिकं याची माहिती मिळेल