जळगाव | जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्यात असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. खडसे कुटुंबियांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Mla Chandrakant Patil) यांना केला आहे. या आरोपामुळे जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावर आरोप केले आहेत. (My life is in danger from senior NCP leader Eknath Khadse and Rohini Khadse says muktainagar assembaly constituency mla chandrakant patil)
नक्की आरोप काय?
"मी शनिवारी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. खडसे पिता-पुत्रीना माझं राजकारणातील वर्चस्व सहन होत नाही. त्यामुळे ते माझ्या विरोधात नेहमीच कट कारस्थानं करत असतात. रोहिणी खडसे यांनी मला चोप देण्याची भाषा केली. यातून माझ्या जिवाला धोका आहे", असं आमदार पाटील यांनी पोलीस अधिक्षकांना निवेदनाद्वारे सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना आमदार चंद्रकात पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप रोहणी खडसेंनी केला. महिलांची छेड काढणाऱ्या आणि त्यांची अडवणूक करणाऱ्यांना चोपच नाही, तर त्यांचे हात तोडून टाकू, असा इशारा रोहिणी खडसे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यावरुन हा सर्व वाद टोकाला पोहचला.
वादाला असं फुटलं तोंड
जिल्ह्यात 21 डिसेंबरला बोदवड नगर पंचायतीसाठीच्या निवडणुकीची मतदानप्रक्रिया पार पडली. या दिवशी राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली. या दरम्यान सेनेचे कार्यकर्ते हे माझ्या अंगावर धावून आले असा आरोप रोहिणी खडसेंनी केला.
या सर्व प्रकाराची तक्रार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावर शिवसेनेने राष्ट्रवादी आपल्यावर खोटे आरोप करतेय, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
दोन्ही पक्षांकडून जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली. यानंतर वादाला तोंड फुटलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या स्टेटसवरुन. यामुळे आता वाद आणखी चिघळला.
यावरुन राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांशी सेनेचे पदाधिकारी हे असभ्यपणे वागून विनयभंग केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. यावरुन राष्ट्रवादीने 24 डिसेंबरला स्थानिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला.
आरोपांवर खडसे काय म्हणाले?
"माझ्यापासून आमदार पाटील यांना धोका आहे असं म्हणनं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. माझ्यावर अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यांची नोंद नाही. जे गुन्हे आहेत ते सर्व राजकीय आहेत", असं खडसे म्हणाले.
"पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मुक्ताई नगरमध्ये अवैध धंदे आहेत. तालुक्यात सट्टा, जुगार, अवैध रेती आणि आर टी ओ अधिकाऱ्यांशी संगनमत करून नाक्यावर वसुली करण्या सारखे अवैध धंदे आहेत. राष्ट्रवादीने हे दोन नंबरचे धंदे बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवदेन दिले होते", असं खडसेंनी स्पष्ट केलं.
"तसेच दिलेल्या निवदेनानुसार हे अवैध धंदे रोखावेत, असं आवाहन केलं होतं. त्यानुसार पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली. यावरुन आमदार पाटील यांचा संताप होणं स्वाभाविक आहे. याच संतापातून त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यांचे हे 2 नंबरचे धंदे बंद होत नाहीत, तोवर स्वस्थ बसणार नाही", असं खडसे यांनी स्पष्ट केलं.