क्षुल्लक कारणावरुन बारमध्ये भांडण; बाहेर पडताच तोंडावरुन बाईक नेली अन्... नांदेडमधील खळबळजनक प्रकार

Naded Crime : नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हल्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 29, 2023, 03:28 PM IST
क्षुल्लक कारणावरुन बारमध्ये भांडण; बाहेर पडताच तोंडावरुन बाईक नेली अन्... नांदेडमधील खळबळजनक प्रकार title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाचा मारहाण करुन खून करण्यात आला आहे. सात ते आठ आरोपींनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

माझ्याकडे का बघतोस एवढ्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून नांदेडमध्ये एका युवकाचा खून करण्यात आला. नांदेडच्या एल आय सी ऑफिस जवळील जी एन बारमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. आरोपींनी मारहाण केल्याने व्यंकटेश वल्लमवार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.

व्यंकटेश वल्लमवार याची व्यंकटेश बारसमोर पानपट्टी आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास व्यंकटेश हा पाणी पिण्यासाठी जी एन बार मध्ये गेला होता. मात्र तिथे बसलेल्या आरोपींनी आमच्याकडे का बघतोस असे म्हणून व्यंकटेश सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. त्यानंतर आरोपींना व्यकंटशेला बारच्या बाहेर आणलं. बारसमोरील पार्किंगमध्ये सात ते आठ आरोपींनी व्यंकटेशला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे एका आरोपीने तर व्यंकटेशच्या तोंडावरून दोन ते तीन वेळा बाईक नेली. यातच त्याचा मृत्यू झाला. पोलीसांनी याप्रकरणी आठ आरोपींनी अटक केल्याची माहिती आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

"रात्री दीड ते दोनच्या दरम्यान नागार्जुन हॉटेलजवळ भांडण झाल्याचा फोन आला होता. त्यानंतर आमचे पथक तिथे पोहोचले. तिथे व्यकंटेश वल्लमवार या व्यक्तीचा सात ते आठ जणांनी मिळून लाथा बुक्क्यांनी मारुन जखमी केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यातील आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु आहे. आरोपींवर भादवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपी दारु पिण्यासाठी हॉटेल नागार्जूनमध्ये गेले होते. मयत व्यकंटेशची पानटपरी आहे. तो हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपींनी व्यंकटेशला तू माझ्याकडे का बघतोस असे विचारले आणि वाद घालण्यास सुरुवात केली," अशी माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिली.