'चाकरमान्यांना कोकणात यायला बंदी घातली, तर आंदोलन', राणेंचा इशारा

नारायण राणेंचा आंदोलनाचा इशारा

Updated: Jul 10, 2020, 05:59 PM IST
'चाकरमान्यांना कोकणात यायला बंदी घातली, तर आंदोलन', राणेंचा इशारा title=

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा ई-पास अनिवार्य असणार आहे. तसंच ७ ऑगस्ट २०२०ला रात्री बारा वाजल्यानंतर पुढे कोणाही बाहेरच्या व्यक्तीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हा मुख्यालयातील बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पण या मुद्द्यावरून आता भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे आक्रमक झाले आहेत.

कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी, असं होऊ शकत नाही. असा आदेश निघाला नाही, पण जर बंदी आदेश आला तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. घरी जाण्यासाठी ई-पास कशाला हवा? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्गात कोरोना मुंबईकरांमुळे पसरला, असही राणे म्हणाले. 

इतर भागांतून जिल्ह्यात येणाऱ्यांना रितसरपणे क्वारंटाईनही व्हावं लागणार आहे. त्यासाठी योग्य ती व्यवस्था करुनच नागरिकांनी पुढील निर्णय घेण्याचं सांगण्यात येत आहे. विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे. शिवाय गणपतीच्या मूर्तींची उंची, गणेशोत्सवासाठीच्या खरेदीचे नियम, मिरवणुकांवरील निर्बंधस असे अनेक नियम आणि निर्णय जिल्हा मुख्यालयातील बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.