Nashik News : बाईकवरुन जाताना आला Heart Attack... तरुणाने पुढे येत पोलीस कर्मचाऱ्याचा वाचवला जीव

Nashik News : कामावर जात असतानाच या पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र बाजारपेठेतून जाणाऱ्या एका तरुणानेच देवदूतासारखे तिथे येत या पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले आहेत. तरुणाने योग्य उपचार देत या पोलीस कर्मचाऱ्याला जीवनदान दिलं आहे.

आकाश नेटके | Updated: May 14, 2023, 10:08 AM IST
Nashik News : बाईकवरुन जाताना आला Heart Attack... तरुणाने पुढे येत पोलीस कर्मचाऱ्याचा वाचवला जीव title=

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही काळापासून हृदयविकाराच्या (Heart disease) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांना हृदयविकाराच्या घटनांमुळे कोणत्याही क्षणी आणि कुठेही हृदयविकाराचे झटके (heart attack) येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेकांना कधी कधी प्राण गमवावे लागले आहेत. मात्र योग्य उपचारांमुळे अनेकांचा प्राण देखील वाचले आहेत. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये घडलाय. नाशिकच्या (Nashik News) मनमाडमध्ये एका व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्याला जीवनदान दिलं आहे. देवदूतासारखं धावून येत तरुणाने या पोलीस कर्मचाऱ्याचे (Nashik Police) प्राण वाचवले आहेत. तरुणाच्या धाडसामुळे आज त्या पोलीस कर्मचाऱ्याला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं आहे. तरुणाच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

भररस्त्यात आला हृदयविकाराचा झटका

नाशिकच्या मनमाडमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे एका तरुणाने प्राण वाचवले आहे. भर रस्त्यातच पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तरुणाने पुढे येत योग्य उपचार देत त्याचे प्राण वाचवले आहेत. नागेश दांडे हे रेल्वे पोलीस दुचाकीवरून ड्युटीवर जात होते. त्यावेळी शहरातील बाजार पेठेत त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते दुचाकीवरून खाली पडले. नागेश दांडे अचानक खाली कोसळल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मात्र मदतीला कोणीही पुढे आले नाही.

तरुणाने वाचवले पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण

बाजार पेठेतून जाताना भागवत झाल्टे हा तरुणाने गर्दी पाहून नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी पुढे गेला असता त्याला धक्का बसला. भागवतने एक पोलीस कर्मचारी खाली पडल्याचे पाहिले. पोलीस कर्मचारी नागेश दंडे यांना अस्वस्थ पाहून भागवतने त्यांना हृदयविकाराचा झटाका आल्याचे ओळखले. त्यानंतर भागवतने क्षणाचाही विलंब न करता नागेश दांडे यांच्या छातीवर दोन्ही हातांनी तीन-चार वेळा दाब देऊन (CPR) त्यांना तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न केला.

भागवतच्या या प्रयत्नामुळे नागेश दंडे हे शुद्धीवर आले. यानंतर तात्काळ पोलीस हवालदार नागेश दंडे यांना रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता दंडे यांना जोराचा हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. मात्र भागवतने समयसूचकता दाखवल्याने नागेश दंडे यांचे प्राण वाचले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान भागवत झाल्टे हा तरुण एका प्रकारे हृदयविकाराचा झटका आलेल्या नागेश दंडे यांच्यासाठी देवदूत ठरल्याची भावना मनमाडमध्ये व्यक्त होत आहे.