Vajramuth Mahasabha: ...यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Vajramuth Mahasabha: वज्रमूठ सभेत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही इतका भ्रष्टाचारी कारभार सुरु आहे असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला.   

शिवराज यादव | Updated: May 1, 2023, 08:51 PM IST
Vajramuth Mahasabha: ...यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल title=

Vajramuth Mahasabha:  महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही इतका भ्रष्टाचारी कारभार सुरु आहे असा गंभीर आरोप राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांचा वारेमापपणे वापर केला जात आहे. याआधीच्या मुख्यमंत्र्यांनी जाहिरातीबाजीवर केला नाही, तितका जनतेचा पैसा गेल्या 10 महिन्यात खर्च झाला आहे असाही आरोप अजित पवार यांनी केला आहे. मुंबईत वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला उद्धव ठाकरे, संजय राऊत, अशोक चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील असे महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेते उपस्थित आहेत. यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. 

"मुंबईचं मराठीपण टिकवण्यात आणि मान सन्मान कोणी वाढवला असेल तर तो दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेमुळे मुंबई टिकली, मराठी माणसाचा स्वाभिमान राहिला हे वास्तव नाकारुन चालणार नाही. नेमकं हेच काही लोकांच्या डोळ्यात खुपलं. सध्याचं सरकार पाहता संविधान, घटना, कायदा राहणार आहे का याचा विचार तुम्हाला करायचा आहे," असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. "सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं आहे. जनता आपल्या पाठीशी आहे. सर्वांनी एकत्रित यांचा सामना करायचा आहे," असंही अजित पवारांनी सांगितलं. 

"सरकारकने करोडोंची बिलं थकवली आहेत. कंत्राटदारांना थांबायला सांगितलं आहे. यासाठी कोण जबाबदार आहे? मुख्यमंत्री त्यासाठी जबाबदार नाहीत का?," अशी विचारणा अजित पवारांनी केली आहे. "पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. बागा, पिकं उद्ध्वस्त झाली असताना मदत करण्याची भूमिका घेतलेली नाही. याचं कारण शिंदे, फडणवीस यांना बाकीच्या कामात जास्त रस आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कोयता गँगमध्ये मस्तवालपणा कसा आला आहे. पोलिसांना आदेश देता येत नाही का?सर्वसामान्यांनी दाद कुठे मागायची?," असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे. 

"राज्यात अवकाळी पाऊस पडला आहे. तसंच 1 ते 5 तारखेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागणार आहे," असं आवाहन अजित पवारांनी केलं. सरकार निवडणुका घेण्यास का घाबरत आहे? पालिका, नगरपंचायत निवडणुका जाहीर का करत नाही? इतकी भीती कसली वाटत आहे? निवडणुका झाल्यावर जनता काय करेल याचा विश्वास शिंदे, फडणवीस यांना नाही. लोकांना निवडून देण्याची संधी का देत नाही. कटाक्षाने याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आपल्याला या विरोधात आवाज उठवायचा आहे," असं अजित पवारांनी सांगितलं. 

" हे लोकांच्या मनातील सरकार नाही. दगाफटका, गद्दारी करुन आलेलं हे सरकार आहे. महाराष्ट्राने हे कधीही सहन केलेलं नाही. महापुरुषांचं आदर्श असणाऱ्या या राज्यात चुकीच्या पद्धतीने कारभार सुरु आहे.बेरोजगारीदेखील वाढली आहे. 75 हजार जागा भरण्यासाठी का थांबला आहात. सहनशीलतेचा अंत का पाहत आहात? नुसतं आपलं सर्वसामान्यांचं सरकार असा बोभाटा केला जात आहे," अशी टीका अजिता पवारांनी केली.

"सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक म्हटलं. त्याचीही यांना जनाची, मनाची लाज वाटत नाही. दंगली होत असताना थांबवू शकत नाही ते नपुंसक सरकार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? पण नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्र्यांना याचं काही वाटत नाही. मुख्यमंत्र्याना साधं पंतप्रधआन कोण माहिती नाही, द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख केला होता. जमत नसेल तर नोट काढून वाचा. घोटाळा करुनच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे," असा इशारा अजित पवारांनी दिला. 

"आपल्याला एकी दाखवण्यासाठी एक दोन पावलं पुढे मागं करावी लागली तर मनाची तयारी ठेवली पाहिजे. वरिष्ठांनीही मनाचा मोठेपणा दाखवला पहिजे. जो जिंकू शकतो त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे," असं आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं.