Forest Walkway Malabar Hill in Mumbai: मुंबईतील गर्दी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोकळा श्वास घेणेदेखील कठिण होत आहे. शहरीकरण आणि प्रदुषणाचा स्तरदेखील वाढला आहे. मुंबईत अनेक प्रकल्पांचे काम एकाचवेळी सुरू आहे. मुंबईकरांना थोडा मोकळा श्वास आणि हिरवळ अनुभवता यावी यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून एका महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखला जाणाऱ्या मलबार हिल परिसरात मुंबईतील पहिली तरंगती पायवाट म्हणजेच एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे साकारण्यात येत आहे. लवकरच हा प्रकल्प नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. एकूण 482 मीटर लांबीचा हा प्रकल्प असून तो एक किमी इतका आहे. या पुलाची वाहनक्षमता सुमारे 500 किलो चौरस मीटर इतकी आहे. ज्या खांबावर हा वॉकवे उभारण्यात आला आहे. ते काँक्रीटऐवजी स्टील वापरुन करण्यात आले आहेत. हा प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 25 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र हा खर्च आणखी पुढे वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मलबार हिलच्या झाडीतून हा वॉकवे तयार करण्यात आला आहे. या ठिकाणावरुन गिरगाव चौपाटीचे दर्शनही होणार आहे. सिंगापूरच्या जंगलातील प्रसिद्ध एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेची प्रेरणा घेऊन मुंबईत हा वॉकवे बांधण्यात येणार आहे. मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कपासून सुरू होऊन डूंगरवाडी इथपर्यंत. या वॉकवेवरुन चालताना मुंबईकरांना निसर्गरम्य सौंदर्यदेखील अनुभवता येणार आहे. तसंच, अरबी समुद्राचे सौंदर्यदेखील पाहता येणार आहे.
सध्या या वॉकवेच्या विद्युतीकरण, रंगकाम, शौचालय आणि तिकिट काउंटरचे काम पूर्ण केले जात आहे. त्यामुळं नवीन वर्षात म्हणजेच 2025 पासूनच हा वॉकवे नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कोणत्याही झाडांना हानी न पोहोचवता हा वॉकवे तयार करण्यात आला आहे. त्यामुळं नव्या वर्षात मुंबईकरांना एक वेगळा प्रवास अनुभवता येणार आहे. तसंच, या मुळं पर्यटकांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.