"जेव्हा तुम्ही औरंगजेबाला छोटं करता...", शिवरायांसंबंधी 'त्या' विधानावर आव्हाडांनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण

Jitendra Awhad Black and White Interview: जेव्हा तुम्ही औरंगजेबाला छोटं करता तेव्हा महाराजांना खूप मोठं करु शकत नाही. तो खूप मोठा औरंगजेब होता, ज्याला शिवाजी महाराजांनी लाथाडलं आणि खाली पाडलं असं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विधानानंतर सुरु असलेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.   

Updated: Feb 7, 2023, 03:18 PM IST
"जेव्हा तुम्ही औरंगजेबाला छोटं करता...", शिवरायांसंबंधी 'त्या' विधानावर आव्हाडांनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण title=

Jitendra Awhad Black and White Interview: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या विधानामुळे सध्या राज्यात वाद सुरु आहे. समोर औरंगजेब (Aurangzeb) ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना असं वक्तव्य आव्हाडांनी केल्यानंतर त्यावरुन टीका सुरु आहे. यादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांच्याशी संवाद साधताना या वादावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. वाद घातल्याशिवाय त्यातील स्पष्टता आणि सत्यता बाहेर पडत नाही असं सूचक विधान यावेळी त्यांनी केलं. 

"महाराष्ट्रातील एका माणसाने रामदास स्वामी (Ramdas Swami) नसते तर शिवाजी महाराज कुठे असते असं म्हटलं होतं. त्यावर कोणीही काही म्हटलं नाही, आक्षेप घेतला नाही, रागावलं नाही. आमच्यासारखे दोघे तिघेच बोलले. मग त्यांना शिवाजी महाराजांची उंची, कर्तृत्व, शूरता दिसली नव्हती का?," अशी विचारणा करत जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. 

"रामदास स्वामी महाराजांच्या आयुष्यात होते की नव्हते हे माहिती नाही. कारण महाराष्ट्र सरकराने घेतलेल्या शासकीय निर्णयानुसार, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांना भेटलेच नव्हते. हे मी बोललो की वाद निर्माण होतो, पण ते बोलले की वाद निर्माण होत नाही," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान शिवाजी महाराज गोट्या खेळवताना दाखवणार का? या विधानासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले "गोट्या खेळत असते का हे फक्त उदाहरण होतं. मी आवेशात बोललो असे म्हणू शकता. पण मी तेवढं सोडून कुठेही चुकलेलो नाही. जग जिंकणयास आलेला अलेक्झांडर पोरस राजाशी लढला. पण त्यानंतर त्याला मागे जावं लागलं आणि रस्त्यात मृत्यू झाला. जर अलेक्झांडर आला नसता तर पोरसचं राज्य कधी समोरच आलं नसतं". 

"जेव्हा तुम्ही औरंगजेबाला छोटं करता तेव्हा महाराजांना खूप मोठं करु शकत नाही"

"औरंगजेबाला मरेपर्यंत मराठ्यांनी महाराष्ट्रात टिकू दिलं नाही. यात मराठ्यांचा मोठेपणा आहे. अख्ख्या राजपूंताचा प्रदेश ताब्यात ठेवणारा औरंगजेब, अकबर, बाबर हे महाराष्ट्रात काही करु शकले नाहीत, यात महाराष्ट्र मोठेपणा झाला. पण काहीजणांना मुद्दामून वाद घालायचा आहे. मोघलांचा इतिहास काढून टाका असं तावडे म्हणाले होते. तावडेंना सारवासारव करावी लागली. शिवाजी महाराजांचा भौगोलिक अभ्यास केला तर कोकण किनारा त्यांनी ताब्यात ठेवला होता आणि इतर सगळीकडून ते घेरलेले होते. तरी ते लढत होते. इंग्रजांनी आपल्या डायरीत महाराज दरी खोऱ्यात जन्माला आले हे नशीब, समुद्रकिनारी जन्माला आले असते तर जग ताब्यात घेतलं असतं असं लिहिलं आहे. त्यांचं मोठेपण यातच आहे. एका छोट्या स्वराज्याचे संस्थापक असताना, त्यांनी मोठ्या राजवटी संपवून टाकल्या. मग त्या मोठ्या राजवटी होत्या हे स्विकारायचं नाही का? औरंगजेब दिल्लीच्या जवळचा 100 मीटरचा राजा होता असं म्हणायचं का? जेव्हा तुम्ही औरंगजेबाला छोटं करता तेव्हा महाराजांना खूप मोठं करु शकत नाही. तो खूप मोठा औरंगजेब होता, ज्याला शिवाजी महाराजांनी लाथाडलं आणि खाली पाडलं," असं आव्हाडांनी सांगितलं.

"राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रात महाल, राजवाडे का उभे राहिले नाहीत? कारण आपलं आयुष्य घोड्यावरुन लढाया लढण्यातच गेलं. हीच महाराष्ट्राची ओळख आहे. मुघलांच्या अंगावर गेलेला फक्त महाराष्ट्रच होता. मग मुघलांना काढून टाकल्यास तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास काय सांगणार?," अशी विचारणा आव्हाडांनी केली. 

 

आव्हाडांच्या कोणत्या विधानावरुन वाद?

जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात बोलताना एक विधान केले होते. “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे ना. १६६९ साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.