रोहित पवारांनी मॅक्सवेलच्या तुफान खेळीची शरद पवारांशी केली तुलना, म्हणाले 'योद्धा जखमी झाला तरी...'

वर्ल्डकपमध्ये मंगळवारी ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ आलं होतं. या वादळाने अखेर संघाला विजयी करतच नमतं घेतलं. यानंतर संपूर्ण क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 8, 2023, 12:21 PM IST
रोहित पवारांनी मॅक्सवेलच्या तुफान खेळीची शरद पवारांशी केली तुलना, म्हणाले 'योद्धा जखमी झाला तरी...' title=

वर्ल्डकपमध्ये मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ आमने-सामने आले असता क्रिकेटरसिकांना जबरदस्त सामना अनुभवण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ समोर असतानाही अफगाणिस्तानने त्यांना झुंजवत सामना आपल्या दिशेने झुकवला होता. पण मैदानात मॅक्सवेल नावाचं वादळ अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख करण्याच्या हेतूने तळ ठोकून उभं होतं. पायही न हलवता तडाखेबंद फलंदाजी करत मॅक्सवेलने 201 धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला. क्रिकेटरसिकांसाठी हा सामना एक पर्वणीच होती. या सामन्यानंतर संपूर्ण जगभरातून मॅक्सवेलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. फक्त क्रीडाच नाही तर राजकारणातही याचे पडसाद उमटत आहेत. 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मॅक्सवेलच्या या तुफानी खेळीची तुलना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंच्याशी केली आहे.  मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं असं सांगत रोहित पवारांनी शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेचा उल्लेख केला आहे. एक्सवर त्यांनी पोस्ट शेअर करत यामध्ये शरद पवार आणि मॅक्सवेलचा फोटो शेअर केला आहे. 

रोहित पवारांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "परिस्थिती कितीही विरोधात असली, मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं. नुसतं लढावंच लागतं असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागत अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते. मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं".

सामन्यात काय घडलं?

ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक झळकावत अफगाणिस्तानविरुद्धचा सामना एकहाती जिंकून दिला. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये नाबाद 201 धावा केल्या.  मॅक्सवेलने मिळवून दिलेल्या या विजयामुळे ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. 292 धावांचा पाठलाग करताना 91 धावांच्या आत 7 गडी बाद झालेले असताना मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या दोघांनी अधिक पडझड न होऊ देता सामना जिंकवून दिला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडचा विजयाचा घास मॅक्सवेलने ओढून घेतला. 

मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये नाबाद 201 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून द्विशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. मॅक्सवेलच्या पायामध्ये क्रॅम्प आलेला असतानाही त्याने मैदान सोडलं नाही. मॅक्सवेल खेळणार नाही असं वाटत असतानाही तो शेवटपर्यंत मैदानावर उभा होता.