close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर राहुल गांधींकडून भाषणात 'हा' बदल?

देशातील सर्व चौकीदार इमानदार, फक्त एकजण बेईमान

Updated: Apr 15, 2019, 09:21 PM IST
सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर राहुल गांधींकडून भाषणात 'हा' बदल?

नांदेड: 'चौकीदार चोर है' या घोषणेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या पद्धतीमध्ये एक लक्षणीय बदल केला आहे. राहुल गांधी यांच्या फतेहपूर सिक्री आणि नांदेडमधील भाषणांवेळी याचा प्रत्यय आला. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे 'चौकीदार चोर है' अशी घोषणा देणे टाळले. याऐवजी राहुल गांधी केवळ 'चौकीदार' म्हणून थांबत आणि समोरील कार्यकर्त्यांकडून 'चोर है', हे असे वदवून घेत होते. फतेहपूर सिक्री आणि नांदेडमधील भाषणात हा पॅटर्न दिसून आला. त्यामुळे राहुल गांधी यांनी हा बदल सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे तर केला तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

दरम्यान, नांदेड येथील भाषणात राहुल यांनी राफेल मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. देशातील सगळे चौकीदार इनामदार आहेत, पण या एका चौकीदाराने सगळ्यांना बदनाम केल्याचा टोला राहुल यांनी मोदींना लगावला. राफेल घोटाळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दीड तास भाषण केले. मात्र, या भाषणात त्यांनी राफेलविषयी चकार शब्दही काढला नाही, असे राहुल यांनी म्हटले. 

तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीएवढ्या रकमेची उद्योगपतींची कर्जे माफ केल्याचा आरोपही त्यांनी केला. विमा कंपन्यांनी १० हजार कोटी रुपये शेतकर्‍यांकडून घेतले. यामध्ये अनिल अंबानीची कंपनी आहे. त्यांनी शेतकर्‍यांकडून पैसे घेतले. मात्र, पिकांचे नुकसान झाले तरी त्यांना पैसे दिले नाहीत, असे राहुल यांनी सांगितले.