गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक SITच्या ताब्यात

गोविंद पानसरे यांची १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.

Updated: Jan 15, 2019, 12:06 PM IST
गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक SITच्या ताब्यात title=

कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत, काँम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूरमधील विशेष तपास पथकाने मंगळवारी एकाला स्वतःच्या ताब्यात घेतले. अमित दिगवेकर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला मंगळवारीच कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अमित दिगवेकरला याआधीच गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बंगळुरू न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला विशेष तपास पथकाच्या ताब्यात देण्यात आले. अमित दिगवेकरला आजच कोल्हापूरमधील न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येत होती.

गोविंद पानसरे यांची १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. त्याआधी नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१४ रोजी पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने याआधी समीर गायकवाड याला २०१६ मध्ये अटक केली आहे. त्यानंतर तपासात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यालाही कोल्हापूरमधील विशेष तपास पथकाने आपल्या ताब्यात घेतले होते. डॉ. तावडे याला नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. पण गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्येही डॉ. तावडे यांचा हात असल्याचे तपासात दिसल्यावर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. याच प्रकरणात विशेष तपास पथकाने याआधी भरत कुरणे यालाही ताब्यात घेतले आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर कोल्हापूरमधील विशेष तपास पथकाने बंगळुरूमधून त्याला ताब्यात घेतले आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणात त्याची काय भूमिका होती हे शोधण्याचा प्रयत्न केला. गौरी लंकेश, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलक यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांना पिस्तुल चालवण्याचे प्रशिक्षण भरत कुरणे याने दिल्याचे तपासात आढळले आहे.