close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विरोधकांची युती होऊ न देण्यासाठी भाजपकडून जोरदार ब्लॅकमेलिंग- प्रकाश आंबेडकर

नाना पटोले हे काँग्रेसचे डमी उमेदवार 

Updated: Mar 14, 2019, 03:47 PM IST
विरोधकांची युती होऊ न देण्यासाठी भाजपकडून जोरदार ब्लॅकमेलिंग- प्रकाश आंबेडकर

अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र आल्यास भाजपसमोर अडचण निर्माण होईल. त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरोधकांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांनी गुरुवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सध्या केवळ नात्यागोत्याती माणसांना खुश करण्यासाठी आणि सत्तेच्या मोहापायी राजकारण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. स्मृती इराणी यांनी गांधी परिवारावर जमीन घोटाळ्यात केलेले आरोप हे दबाव आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. तुम्हाला घोटाळ्यांची माहिती होती तर कारवाई का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी भाजपाला विचारला. यावेळी त्यांनी नागपूरमधून नाना पटोले यांना लोकसभेची उमेदवारी देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावरही टीका केली. नाना पटोले हे डमी उमेदवार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आपण शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्या ४८ उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच निवडणुकीनंतर भारिप पक्ष वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. 

काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलची भूमिका जाहीर न केल्यामुळे आंबेडकर आणि आघाडीच्या नेत्यांमधील बोलणी फिस्कटली होती. यानंतर त्यांनी राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करण्याचा इरादा जाहीर केला होता. प्रकाश आंबेडकर स्वत: सोलापुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे सोलापुरात सुशीलकुमार शिंदे विरूद्ध प्रकाश आंबेडकर अशी हाय होल्टेज लढत रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. दुसऱ्या यादीत भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांना महाराष्ट्रात नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राज बब्बर यांना मोरादाबाद येथून तर भाजपच्या माजी खासदार सावित्री फुले यांना बहराईच (उत्तर प्रदेश) उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर-मध्य मुंबईतून माजी खासदार प्रिया दत्त यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.