मध्य महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

वरुणराजा बरसणार.... 

Updated: Jun 30, 2020, 07:58 AM IST
मध्य महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जून महिन्याच्या अखेरीपर्यंत वरुण राजानं महाराष्ट्रावर फारशी कृपा केली नसली तरीही येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच जुलै महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच २ जुलैपासून महाराष्ट्रामध्ये वरुणराजा त्याच्या मर्जीत आणि अगदी मुसळधार बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं बळीराजाला किमान दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. 

सध्याच्या घडीला कोकण, गोवा, मराठवाड्यातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची सुरुवात धाली आहे. हाच पाऊस येत्या काही तासांमध्ये चांगला जोर पकडणार आहे. शिवाय रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये आणि त्यासोबतच पुणे- सातारा भागातही मान्सून सक्रिय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 

कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरुपात सुरु असणारा पाऊस येत्या एक- दोन दिवसांत चांगला जोर पकडणार आहे. त्यामुळं अखेर बरीच वाट पाहायला लावल्यानंतर पावसाच्या सरी महाराष्ट्राला चिंब भिजवून जातील अशीच आशा व्यक्त केली जात आहे. 

 

यंदाच्या वर्षी मान्सून समामधानकारक असेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. अर्थात त्याची सुरुवातही काहीशी त्याच अंदाजात झाली. पावसाला जोमानं सुरुवात झाल्यामुळं बळीराजानंही शेतीची कामं हाती घेत पेरणीही केली. पण, पिकं डोकं वर काढण्याच्या काळातच पावसानं पाठ फिरवली त्यामुळं राज्यातील बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. ही सर्व परिस्थिती पाहता हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज आणि दाराशी असणाऱ्या वरुणराजाकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.