पुण्यात अंधश्रद्धेचा 'गुंता' सुटला

Updated: May 24, 2018, 11:46 PM IST

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : एखाद्या महिलेच्या केसांतील जट बघितली की अक्षरशः किळस येते, त्याचवेळी त्या महिलेला त्या जटेपायी काय यातना भोगाव्या लागत असतील त्याबद्दल वाईटही वाटतं. केसांमध्ये घट्ट बसलेली जट समाजातील अंधश्रेद्धेचं प्रतीक आहे. अनिसच्या पुण्यातील कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी या जटमुक्तीचा लढा हाती घेतलाय. पुण्यातील पार्वती केंदळे या महिलेच्या केसातील जट काढून त्यांनी जटमुक्तीचं अर्धशतक पूर्ण केलय. पाहूया एक रिपोर्ट... 

पार्वती केंदळे या आज अंधश्रद्धेच्या जोखडातून एकदाच्या मुक्त झाल्यात. डोक्यावरच्या केसांमध्ये असलेलं हे ओझं त्यांनी सुमारे १५ वर्षं सांभाळलं होतं. तब्बल साडेचार फूट लांबीच्या या जटेनं त्यांचं जगणं अवघड केलं होतं. उठता- बसता अडचण व्हायची, त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न होता. केसांमध्ये कधीतरी अचानकपणे दिसून आलेल्या जटेपायी त्यांचं आयुष्यच बदललं होतं. 

देवाचं किंवा देवीचं हे देणं असतं या गैरसमजुतीतून त्यांना केसांना हात लावण्यापासून मनाई करण्यात आली होती. अशा परिस्थितीत अंनिसचे कार्यकर्ते असलेल्या माधव गांधीच्या संपर्कात त्या आल्या. महिलांमधल्या जटमुक्तीचा ध्यास घेतलेल्या नंदिनी जाधव यांनी त्यांना जट काढण्यासाठी मोठ्या कष्टानं प्रवृत्त केलं. आणि अखेर त्यांच्या केसांतली जट कात्री लावून वेगळी करण्यात आली. 

सामाजिक कार्यकर्त्या डॉ शैला दाभोलकर यांच्या उपस्थितीत पार्वतीबाईंची जट काढण्यात आली. केसांतील जट काढली तर देवीचा कोप होतो अशी अंधश्रद्धा आहे. केसांतली जट म्हणजे भीतीपोटी निर्माण झालेला मानसिक गुंता असतो. त्यामुळे मनातल्या अंधश्रेद्धेची जट काढली जाणं सगळ्यात महत्त्वाचं.

नंदिनी जाधव या व्यवसायानं ब्युटिशियन आहेत. अंनिसच्या संपर्कात आल्यांनतर त्यांनी जटामुक्तीचं कार्य हाती घेतलंय. गेल्या साडेतीन वर्षांत ५० महिलांची त्यांनी जटामुक्ती केलीय. त्यामुळे महिलांचं केवळ बाह्यरुपच नव्हे तर त्यांचं संपूर्ण आयुष्य अंतर्बाह्य सुंदर बनवण्याचं काम ही ब्युटिशियन करते. त्यांच्या या कार्याला झी २४ तासचा सलाम !