पुण्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर

स्वच्छता बाळगा, कोरोनापासून सावध राहा 

Updated: Mar 11, 2020, 07:42 AM IST
पुण्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर title=

पुणे : पुण्यात दुबईहून फिरून आलेल्या एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली. यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील त्या दाम्पत्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ही पाचवर पोहोचली आहे. 

त्याचप्रमाणे ज्या ओला चालकासोबत या दाम्पत्याने मुंबई ते पुणे असा प्रवास केला त्यांची देखील कोरोना चाचणी ही पॉझिटीव आली आहे. पुण्यातील या दाम्पत्यासह त्यांच्या मुलीचा आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. 

या पाचही जणांना नायडू रूग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहे. तसेच या तीन व्यक्तींनी आतापर्यंत कुणाकुणाशी संपर्क साधला त्या सगळ्यांची चौकशी करून त्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाने मुंबई आणि पुण्यात प्रवेश केला आहे. आता नागरिकांनी न घाबरता योग्य ती काळजी घ्यायला हवी. ('त्या' टॅक्सी ड्रायव्हरलाही कोरोनाची लागण, मुंबईतही कोरोनाची एन्ट्री ?) 

 

दुबईला 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत फिरायला गेले होते. 1 मार्चला ते मुंबईहून पुण्यात गेले. या दाम्पत्यापैकी पुरूषाला सुरूवातीला ताप आला. त्यानंतर सहा दिवसांनी त्यांनी कोरोनाची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या चाचण्या केल्या. याच्या अहवालामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. पत्नीची देखील तपासणी केली. त्यांच्यामध्ये सौम्यप्रमाणात लक्षण दिसली. त्या दोघांना नायडू रूग्णालयात दाखल केलं आहे. (कोरोना : कशी घ्याल काळजी?, दीपक म्हैसकर यांनी दिली 'ही' माहिती !) 

 

 या रुग्णांची ओळख उघड न करण्याचं आवाहन पुण्यातल्या विभागीय आयुक्तांनी नागरिकांना केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेतली जातेय असं त्यांनी सांगितलं आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नागरिकांनी सज्ज राहावं. घाबरून न जाता किंवा कोणत्याही अफवांना बळी न पडता योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.