सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सराईत गुन्हेगारांकडून पुणे शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच पुण्यात 10-12 जणांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूर्ववैमान्यासातून आरोपींनी तलवार, लोखंडी गज, काठ्या डोक्यात घालून तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे.
नितीन म्हस्के असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड अशी आरोपींचे नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के याचे काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्कमध्ये राहणाऱ्या यापैकी काही आरोपींसोबत कुठल्यातरी कारणावरून भांडण झाले होते. यावेळी नितीन म्हस्केने आरोपीपैकी एकावर हल्ला केला होता. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी नितीन म्हस्के यांची हत्या केली आहे.
हल्ल्याचा राग आल्याने आरोपीने बदला म्हणून नितीन म्हस्के यांचा खून करण्याचे ठरवले होते. नितीन म्हस्के हा मंगळवारी रात्री पुण्यातील मंगला टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी सर्व आरोपी हे चिपटगृहाच्या बाहेरच दबा धरुन बसले होते. चित्रपट रात्री एक वाजता संपल्यानंतर म्हस्के बाहेर पडला आणि त्यावेळी 10 ते 12 जणांनी त्याला घेरलं. हातात असलेल्या तलवार, पालघन, काठ्या, लोखंडी गज याचा वापर करत आरोपींनी म्हस्केवर सपासप वार केले. वार करून सर्व आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाले. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या म्हस्केचा तिथेच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये ब्लेडने वार करून मित्राची हत्या
पिंपरी-चिंचवडमध्ये मद्यपान करताना झालेल्या भांडणातून दोघांनी एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी तरुणाचे गुप्तांग कापून त्याचा मृतदेह एका विहिरीत टाकून दिला होता. गेल्या आठवड्यात हा सगळा प्रकार घडला असून याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अभिषेक उर्फ डल्या गायकवाड याला अटक केली आहे. तर दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. गणेश भगवान रोकडे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.