सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) पतीपासून वेगळे राहणाऱ्या पत्नीने केलेल्या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे. विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीचे अपहण करुन हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र सुपारी घेतलेल्या आरोपींनी पतीला हत्येची धमकी देत त्याला लुबाडलं आहे. पीडित पतीने याप्रकरणी पोलिसांत (Pune Police) तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडकी परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला. विभक्त राहणाऱ्या डॉक्टर पतीची पत्नीनेच सुपारी दिली होती. मात्र ज्या आरोपींना पत्नीने सुपारी दिली त्यांनी पतीचे अपहरण केले आणि ठार मारण्याची धमकी देवून त्याच्याच घरात जबरी चोरी केली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रदीप मारुती जाधव (वय 48) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 10 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
फिर्यादी प्रदीप मारुती जाधव हे जनावरांचे डॉक्टर आहेत. प्रदीप जाधव आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात केस सुरु आहे. दरम्यान 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रदीप जाधव यांना फोन आला होता. वडकी गायकवाड रोड या ठिकाणी एक कुत्रे आजारी पडले आहे, असे सांगितले. आरोपींना जाधव यांना कुत्र्याच्या उपचारासाठी वडकी गायकवाड रोड येथे बोलावून घेतले. प्रदीप जाधव त्या ठिकाणी केले असता दोन तीन लोकांनी त्यांना जबरदस्तीने नंबर प्लेट नसलेल्या एका चारचाकी गाडीत बसवले आणि अपहरण केले. गाडीत बसवत आरोपींनी जाधव यांना ठार मारण्याची धमकी दिली आणि पैशाची मागणी केली.
आरोपींनी फिर्यादी प्रदीप जाधव यांच्या गळ्याला चाकू लावून, तुझी सुपारी तुझ्या पत्नी आणि मेव्हण्याने दिली आहे. तुला आम्ही संपून टाकणार आहोत. तू आम्हाला वीस लाख रुपये दिले तर आम्ही तुला सोडू देऊ. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, असे म्हटले. त्यानंतर फिर्यादी प्रदीप जाधव यांना आरोपी त्यांच्या घरी घेऊन आले. जाधव यांच्याकडून घराच्या चाव्या घेतल्या आणि त्यातील दागिने आणि रोख रक्कम अशी 27 लाख 10 हजार रुपयांचे ऐवज लुटून पळ काढला. त्यानंतर जाधव यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठत हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.