पुण्यात भरधाव कारने दोघांना उडवलं! मदत न करता पळला चालक; पाहा CCTV फुटेज

Pune Car Accident CCTV Video: हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहूनच या अपघाताची दाहकता लक्षात येते. धक्कादायक बाब म्हणजे दोन व्यक्तींना धडक दिल्यानंतरही ही कार न थांबता पुढे निघून गेली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 6, 2024, 12:24 PM IST
पुण्यात भरधाव कारने दोघांना उडवलं! मदत न करता पळला चालक; पाहा CCTV फुटेज title=
या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे

Pune Car Accident CCTV Video: पुण्यातील वार्जे भागामध्ये गुरुवारी रात्री एक भीषण अपघात घडला. पुणे-बाहुली मार्गावर एनडीएच्या कोंडावे गेटजवळ एका भरधाव कारने दोन तरुणांना जोरदार धडक दिली. पिकॉक हॉटेलसमोर झालेल्या या भीषण अपघातामध्ये रस्त्याच्या बाजूने चालणारे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

9 वाजून 48 मिनिटांनी घडला अपघात

सीसीटव्ही फुटेजनुसार गुरुवारी रात्री 9 वाजून 48 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. रस्त्याच्या बाजूने दोन तरुण मोबाईलमध्ये पाहत निवांतपणे चालत असल्याचं या व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत. त्यांच्या बाजूने गाड्या जात असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. रस्त्याच्याकडेने चालणाऱ्या या दोघांना अचानक एक भरधाव वेगातील कार धडक देते. ही धडक इतक्या जोरात बसली की हे दोघेही काही फुटांपर्यंत उडाले. दोघांनाही गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दोन्ही जखमी व्यक्तींची ओळख पटू शकलेली नाही. 

न थांबता निघून गेली कार

सीसीटीव्हीमध्ये हे दोघेही अगदी अनभिज्ञ असताना अचानक भरधाव वेगातील कार येऊन त्यांना धडकल्याचं दिसत आहे. धडक लागल्यानंतर हे दोघे काही फुटांपर्यंत हवेत उडून बाजूच्या फुटपाथवर पडले. धक्कादायक बाब म्हणजे कारने धडक देत दोघांना उडवल्यानंतरही ही कार थांबली नाही. त्याच वेगात कार पुढे निघून गेल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पोलिसांनी सुरु केला तपास; नागरिकांना आवाहन

या प्रकरणामध्ये उत्तम नगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असून बेदरकारपणे कार चालवत या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामध्ये हीट अॅण्ड रनचा गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे. या कारचालकाबद्दलची काही माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच या कारबद्दल किंवा कार मालकाबद्दल काही माहिती असेल तर ती कळवावी असं सांगण्यात आलं आहे. याशिवाय कारचालकाने स्वत:हून समोर यावं असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.