राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतीला पुन्हा फटका

 राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस ( rains) झाला आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Updated: Nov 20, 2020, 09:04 PM IST
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतीला पुन्हा फटका
संग्रहित छाया

जालना : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस ( rains) झाला आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुबार पेरणी, अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकरी (Farmer) पार रडकुंडीला आला आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील वडिगोद्री, करंजाळा आणि पांगरखेडा भागात रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वेचणीला आलेला कापूस भीजला आहे. तर मोसंबी आणि डाळींबाचा अंबिया बहारचं नियोजनही कोलमडले आहे. 

तर दुसरीकडे हवामान बदलामुळे वाशिम जिल्ह्यात हरभऱ्याच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तिकडे नाशिक जिल्ह्यात येवल्यासह निफाडमध्ये अवकाळी पाऊस बरसला आहे. त्यामुळे कांद्यावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. तर फुलोरा धरलेल्या द्राक्ष बागांनाही याचा फटका बसलाय. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. 

दोन दिवसापूर्वी अमरावती शहरालगत बडनेरा आणि इतर ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार (Heavy rains) हजेरी लावली.  कापूस (cotton) आणि तुरीला (Tur) या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फटका बसला आहे.  अवघ्या काही मिनिटातच मुसळधार पाऊस बरसल्याने शेतकरी पुन्हा हवालदील झाला आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कपाशी पिकाला याचा फटका बसला आहे.  
 
तसेच वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. शहरात धुवांधार पाऊस झाला.  आधीच नुकसान झाले असताना पुन्हा पाऊस सुरु झाल्याने शेतीला फटका बसला आहे. ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस कोसळला.  कपाशी आणि तूर पिकाच्या नुकसानीची शक्यता आहे.