Rain Update | कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला; यंत्रणा अलर्ट

राज्यात काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे

Updated: Sep 13, 2021, 09:55 AM IST
Rain Update | कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला; यंत्रणा अलर्ट title=

मुंबई : राज्यात काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसत असून बहुतांश धरणे / प्रकल्प भरले आहेत. रायगडमध्येही काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. कोयना, जायकवाडी सारख्या मोठ्या धरणांमधून विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

पुणे
पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः भोर, वेल्हे तालुक्यातील घाटमाथ्यावर शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. शिरगावमध्ये 123 मिलिमीटर आणि हिर्डोशी परिसरात 101 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आलीये त्यामुळे स्थनिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झाले आहे.

सातारा
घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून 40 हजार क्यूसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. सध्या कोयना धरणातून 25 हजार क्युसेक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढवला असल्याची धरण व्यवस्थापनाने माहिती दिली आहे. आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा...सध्या धरणात 104 TMC पाणी साठा आहे.
 
 रायगड
 हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत रायगड जिल्ह्याच्या काही भागात काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. सकाळी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दक्षिण रायगडमधील महाड पोलादपूर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

 जिल्ह्याच्या अन्य भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र काही भागात चक्क ऊन पडल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाड इथं एन डी आर एफ चे पथक तैनात ठेवण्यात आले आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांचा हिरमोड झालाय.