मासेमारी : गोवा सरकारच्या जाचक अटी, कोकणातील मच्छिमारांना फटका

मच्छीसाठी गोवा सरकारने जाचक अटी घातल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका कोकणातील मच्छिमारांना बसतोय. 

Updated: Nov 2, 2018, 11:08 PM IST
मासेमारी : गोवा सरकारच्या जाचक अटी, कोकणातील मच्छिमारांना फटका title=

रत्नागिरी : गोव्यात येणाऱ्या मच्छीसाठी गोवा सरकारने जाचक अटी घातल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका कोकणातील मच्छिमारांना बसतोय. कोकणातील मस्यव्यवसायवर अवलंबून कोट्यावधींची उलाढाल ठप्प झालीये. मच्छिमारांच्या या प्रश्नावर आता नितेश राणेंनी देखील उडी घेतलीय. गोव्यातील बंदीवर आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी गोव्यातील गाड्या सिंधुदुर्गातुन धावू देणार नसल्याचा इशारा गोवा सरकारला दिलाय. 

कोकणातील मासळी गोव्यातून माघारी धाडण्यात येत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचं कारण देत, गोवा सरकारनं ही भूमिका घेतलीय. परिणामी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील मच्छिमारांची कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. 

काहीच महिन्यांच्या अवधीनंतर गोवा सरकारनं पुन्हा कोकणातील मासळीच्या प्रवेशाला आडकाठी केलीय. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज शेकडो टन मासळी, गोवा, कारवार, केरळला जाते. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र गोवा सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनानं मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होत नसल्याचं कारण देत, कोकणातील मासळीला परतीचा रस्ता दाखवलाय. विशेष म्हणजे गोव्यातील प्रवेश बंद झाल्यानं, गोवामार्गे कर्नाटक आणि केरळ राज्यातली मासळीची वाहतूकही अशक्य झालीय. 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून दररोज जवळपास ४०० गाड्यांच्या माध्यमातून शेकडो टन मासळी परराज्यात जाते. यातून गोव्याची सर्वाधिक गरज भागते. मात्र गोव्याच्या नव्या धोरणामुळे स्थानिक बाजारपेठेतही मासळीचे दर घसरु लागलेत. हा तिढा सोडवण्यासाठी खुद्द महाराष्ट्र सरकारला पुढाकार घ्यावा लागणार आहे. अन्यथा आगामी काळात मच्छीबंदी निमित्ताने महाराष्ट्र विरुद्ध गोवा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.