'सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर...', रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharastra Politics : रोहित पवार यांनी (Rohit Pawar) आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अँब्युलन्स घोटाळ्यावरून (Ambulance Scam) सरकारला धारेवर धरलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 31, 2024, 03:32 PM IST
'सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर...', रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट title=
Rohit Pawar On Ambulance Scam

Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने निविदा देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. राज्यातील अत्यावश्यक सेवांसाठी दावोसमध्ये एका स्पॅनिश कंपनीबरोबर करार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील सुमित या कंपनीने त्यांना निविदा करून दिली होती, असा आरोप देखील काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी केला होता. अशातच आता पुन्हा रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून (Ambulance Scam) सरकारला धारेवर धरलंय.

काय म्हणाले रोहित पवार? 

राज्याच्या आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अँब्युलन्स घोटाळ्यात ज्या कंपनीला टेंडर मिळाले, त्या कंपनीची स्थापनाच मुळी चक्क टेंडर मिळाल्यानंतर झालीय. म्हणजे आधी पेपर पास झाले आणि नंतर परीक्षेचा फॉर्म भरला असा हा सगळा सावळा गोंधळ आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

मर्जीतल्या लोकांना काम मिळावं म्हणून सर्व कायदे आणि नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर बसवणं, हे बाजारातून खेकडा विकत घेण्याइतकं सोपं नाही! तरीही पोखरलेल्या व्यवस्थेने ते करून दाखवलं. पण न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्याने आज नाही तरी उद्या मात्र या प्रकरणाचा भांडाफोड झाल्याशिवाय राहणार नाही, असं खुलं आव्हान रोहित पवार यांनी दिलं आहे. 

दरम्यान, राज्य सरकारमधील अनेकांचा विरोध डावलून आणि प्रशासनावर दबाव आणून विशिष्ट आणि ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून ही टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप होता.