Devendra Fadnavis Expose Claims This Leader: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारबरोबरच राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. आयएनएस विक्रांतच्या संवर्धनासाठी लोकांकडून गोळा केलेल्या निधीचं काय झालं? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाशी फडणवीसांचा काय संबंध आहे यासंदर्भात राऊत यांनी भाष्य केलं आहे. घर घर तिरंगा, सेबी-हिंडेनबर्ग-बूच प्रकरणाबरोबरच जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांसारख्या अनेक विषयांवरुन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.
"‘घर घर तिरंगा’ हे राजकीय अभियान मोदी सरकारने सुरू केले. त्या तिरंग्याच्या रक्षणासाठी आजही शेकडो जवानांचे बलिदान सुरूच आहे व दहा वर्षांच्या मोदी काळात तिरंगा जवानांच्या रक्ताने जास्तच भिजला. जम्मू-कश्मीरात रोज आतंकी हल्ले सुरू आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस अतिरेक्यांचा हल्ला झाला व त्यात दोन लष्करी अधिकारी ‘हुतात्मा’ झाले. हे सर्व वेदनादायी आहे आणि लाल किल्ल्यावरील भाषणात आपल्या पंतप्रधानांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही," अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
"अदानी यांच्या कंपन्यांत ‘सेबी’च्या प्रमुख माधवी बूच यांनी गुंतवणूक केली व या कंपन्या बोगस आहेत. हा घोटाळा हिंडनबर्ग रिसर्चने उघड केला. म्हणजे फौजदारच चोरांचे भागीदार बनले. माधवी बूच व त्यांच्या पतीचे हे सरळ मनी लाण्डरिंग आहे व त्यांची भूमिका अदानींच्या बाबतीत संशयास्पद आहे. तरीही बूचबाई त्यांच्या पदावर कायम व भाजपचे प्रवक्ते टीव्ही वाहिन्यांवर अदानी यांचे रोज समर्थन करीत आहेत. राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते. राहुल गांधी यांनी अदानी-माधवी बूच-हिंडनबर्ग घोटाळ्यावर प्रश्न विचारताच मोदी यांच्या सरकारने राहुल गांधी यांच्या मागे ‘ईडी’चा ससेमिरा पुन्हा लावला, पण माधवी बूच ‘सेबी’च्या प्रमुखपदी कायम आहेत. आपल्या देशातील कायदा किती सडवला आहे त्याचे हे उत्तम उदाहरण. राज्यकर्त्यांचे हात बरबटलेले आहेत. ते आता इतके बरबटले आहेत की, देशाचे सर्व चित्रच त्यामुळे बरबटून गेले," अशी टीका राऊत यांनी 'रोखठोक' या 'सामना'मधील सदरातून केली आहे.
नक्की वाचा >> '...तर मोदींनी नोटांवर स्वत:चा फोटो लावला असता; तिरंगा बदलला असता'
"आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली मोदी-शहांचा हस्तक किरीट सोमय्या याने कोट्यवधी रुपये गोळा केले. ते पैसे आपण राजभवनात जमा करू असे लोकांना सांगितले. प्रत्यक्षात त्यातला एक रुपयाही राजभवनात पोहोचला नाही. कोट्यवधी रुपये हडप केले. युद्धनौका विक्रांत भंगारात गेली. हा संरक्षण खात्यातील घोटाळा. त्याची चौकशी सुरू झाली, पण फडणवीस पुन्हा गृहमंत्री होताच त्यांनी हा घोटाळा दाबला व चौकशीच गुंडाळली. ही त्यांची बेगडी देशभक्ती. पोलिसांनी ही चौकशी गुंडाळण्याचा प्रस्ताव मुंबईच्या कोर्टात सादर करताच कोर्ट भडकले व ही चौकशी बंद करता येणार नाही असे पोलिसांना बजावले. गृहमंत्री फडणवीस यांना ही चपराक आहे. भ्रष्टाचाऱ्यांना, देश विकणाऱ्यांना ते पाठीशी घालतात व देशभक्तीच्या खोट्या गप्पा मारतात. विक्रांत युद्धनौका प्रकरणात फडणवीसही उघडे पडले. विक्रांतच्या नावावर जमा केलेले कोट्यवधी रुपये शेवटी गेले कोठे? ते भाजपच्या पक्ष निधीत सामील झाले," असा आरोप राऊत यांनी केला आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणातील घोटाळा 200 कोटींचा असल्याचं सांगितलं जात आहे.
"अयोध्येत रामाचा लिलाव झाला. रामपथावरील दिवेच चोरीस गेले. मोदींच्या लाडक्या उद्योगपतींनी देश विकायला काढला व मोदींच्या लाडक्या चोरांनी युद्धनौका विक्रांतच्या नावाने कोट्यवधी रुपये जमा केले. या भ्रष्टाचाराचा तपासच महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस यांनी बंद केला. पुन्हा ‘भारतमाता की जय’ म्हणायला हे मोकळे!" असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
"या सर्व परिस्थितीत देश उभा आहे तो सामान्य नागरिकांची लढण्याची जिद्द आणि बलिदानासाठी सज्ज असलेल्या आपल्या जवानांमुळे. पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी भाषणे करतात, हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण होतील अशा योजनांच्या घोषणा करतात, पण स्वातंत्र्य दिनाच्या आधी चार अतिरेक्यांना कंठस्नान घालून कॅप्टन दीपक सिंह यांनी कश्मीरच्या भूमीवर हौतात्म्य पत्करले. अतिरेक्यांशी समोरासमोर चकमक झाली व कॅप्टन दीपक सिंह यांच्या छातीत गोळी लागली. ते जखमी झाले. त्या अवस्थेतही ते जवानांना सूचना देत राहिले. मोहिमेचे नेतृत्व करीत पुढे निघाले व शेवटी कोसळून पडले. लाल किल्ल्यावरील तिरंगा आज सुरक्षित आहे तो या असंख्य बलिदानांमुळे. पंतप्रधानांची द्वेषपूर्ण भाषणे, अदानी, सेबी व त्यांचे ‘बूच दांपत्य’ यांच्यामुळे नाही," असा टोला लेखाच्या शेवटी राऊत यांनी लगावला आहे.