लोकसभा पोटनिवडणूक : पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली

पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभा उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजत आहे.  

Updated: Sep 26, 2019, 11:19 PM IST
लोकसभा पोटनिवडणूक : पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली title=
संग्रहित छाया

सातारा : लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजत आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन, भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धरला आहे. मात्र काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी पोटनिवडणूक लढवावी, यासाठी शरद पवारांनीच प्रयत्न सुरू केलेत. साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात लाट असल्याचा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

काँग्रेस उमेदवारांची यादी तयार

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी तयार झाली. पण काँग्रेसचा भाजप शिवसेनेतल्या संभाव्य बंडखोरांवर डोळा आहे. काँग्रेसनं दिल्लीत १०५ उमेदवारांची यादी निश्चित केली. पण भाजप शिवसेनेची यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळं काँग्रेसमध्येही बंडखोरी होऊ, नये यासाठीही काँग्रेस ही सावधगिरी बाळगत आहे.