औरंगाबाद: आक्रमक पण तितकाच मराठमोळा प्रचार ही शिवसेनेची ओळख. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून सुरू झालेली ही परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवली. मात्र, आता हा मराठमोळा पक्ष कूस बदलतोय. औरंगाबादच्या सरस्वती भुवनमध्ये मंगळवारी पार पडलेल्या ‘हॅशटॅग-युवांचा आदित्य’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. या कार्यक्रमाचा बाज शिवसेनेच्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न होता. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना तरुणांशी मोकळेपणाने संवाद साधता यावा, यासाठी रॅम्प उभारण्यात आला होता. चकाचक स्टेज, रँम्प वॉक पोडीयम, तरूणांना बसण्यासाठी खास गॅलरी, रॉक बँड, तरूणांची गर्दी, लाईट्स, अर्ज भरून घेताना शिस्तबद्ध तरूणाई हे सगळे वातावरण शिवसेनेच्या पारंपरिक प्रतिमेला पुरते छेद देणारे होते.
आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत पण सत्तेवर अंकुश ठेवतील- संजय राऊत
तरूणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांनीही तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. अगदी औरंगाबाद शहराच्या समस्यांवरही आदित्य ठाकरे यांनी अडखळत का होईना, उत्तर देऊन समाधान कऱण्याचा प्रयत्न केला. प्रचाराच्या बदललेल्या या रुपाला तरूणाईनंही मनमोकळी दाद दिली. अनेकांना प्रचाराचा हा फंडा आवडला. मात्र, याठिकाणी साधला गेलेला संवाद प्रत्यक्षात उतरावा, अशी अपेक्षाही तरुण मतदारांनी बोलून दाखवली.
शिवसेनेचा हा नवीन अवतार तरुणांना भावल्यामुळे राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरु झाली आहे. मराठमोळ्या पक्षाचा हा कॉर्पोरेट चेहरामोहरा अनेकांना आवडलाय. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत यामुळे शिवसेनेला यश मिळणार का, हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरेल.