नागपूर : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि प्रदीर्घ वाटाघाटीनंतर भाजप-शिवसेना युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला विदर्भातील लोकसभेच्या 10 जागांचे समीकरण पुन्हा नव्याने मांडावे लागणार आहे. विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे. विदर्भातल्या 10 जागांपैकी 5 जागा भाजप, 4 जागा शिवसेना आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. 2014च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनने विदर्भातल्या सर्व 10 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. पण पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघ भाजपाला गमवावा लागला होता. आता युती झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
पश्चिम विदर्भातल्या अमरावती, बुलडाणा, यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेचा चांगला जोर आहे. मात्र बुलडाण्यात प्रतावराव जाधव आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात भावना गवळी यांना पक्षातूनच आव्हान राहणार आहे. तर पूर्व विदर्भात भाजपची पकड मजबूत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला या युतीचा मोठा फायदा मिळणार आहे, असे राजकीय विश्लेषक सुरेश भुसारी सांगतात.
विदर्भात भाजपचे संघटन मजबूत असले तरी युती झाली नसती तर काही जागांवर भाजपला फटका बसला असता. मात्र आता युतीमुळे विशेषतः पश्चिम विदर्भात दोन्ही पक्षांना मोठा फायदाच होणार आहे. विशेष करुन शिवसेनेला याचा जास्त फायदा होणार आहे. तर भाजपच्या कमी होणाऱ्या जागा कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.