मुंबई : छोट्या पडद्यावर छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्याच ते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीचा शिवसेनेला हा मोठा दे धक्का असणार आहे. अमोल कोल्हे हे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत. ते मूळचे शिरुरचे आहेत. कोल्हे हे राष्ट्रवादीकडून शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांच्याशिवाय दोन माजी आमदारही शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील हेही उपस्थित असणार आहेत. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. बारामती येथील गोविंदबाग या शरद पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली होती. त्यावळेी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडही त्यांच्यासोबत होते.
अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याने हा शिवसेनेसाठी ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी महाराजांच्या विचाराचे बोट धरून चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शिवसेना प्रवेशाच्यावेळी दिली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अमोल कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते.