शिवसेना नेत्याच्या मारेकरी पत्नीची तुरुंगात आत्महत्या

गेल्या वर्षी २० एप्रिलला भाडोत्री मारेकरी प्रमोद लुटे आणि त्याच्या सहकाऱ्यानं शैलेश निमसे यांची हत्या केली होती

Updated: Jan 29, 2019, 01:00 PM IST
शिवसेना नेत्याच्या मारेकरी पत्नीची तुरुंगात आत्महत्या  title=

कल्याण : शहापूरचे शिवसेना नेते शैलश निमसे यांच्या हत्येच्या आरोपाखाली कैदेत असलेली त्यांची पत्नी वैशालीनं आत्महत्या केलीय. रविवारी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात वैशाली निमसेचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. शैलेश निमसे यांची विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून हत्येची सुपारी दिल्याचा आरोप वैशाली उर्फ साक्षी निमसे यांच्यावर होता. त्या अंतर्गत खटलाही सुरू आहे. गेल्या वर्षी २० एप्रिलला भाडोत्री मारेकरी प्रमोद लुटे आणि त्याच्या सहकाऱ्यानं गणेशपुरीजवळ शैलेश निमसे यांची हत्या केली होती. 

शैलेश निमसे हत्या प्रकरण

पोलिसांच्या तपासात ४५ वर्षीय शैलेश निमसेंच्या हत्येसाठी पत्नी वैशालीनंच दीड लाखांची सुपारी दिल्याचे तपासात पुढे आलं होतं. शैलेश निमसे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, असा पत्नीचा आरोप होता. तर दुसरीकडे शैलेश यांनी त्यांच्या पत्नीला मालमत्तेच्या अधिकारातून बेदखल केलं होते आणि घटस्फोटाच्या कागदपत्रांवर तिची जबरदस्तीनं सही घेतली होती, अशी माहिती पुढे आली होती.

याचाच राग वैशालीच्या डोक्यात होता. त्यामुळे वैशालीनं एका नातेवाईकाची मदत घेत शैलेश यांचा काटा काढायचा ठरवलं. त्यासाठी साक्षीनं मारेकऱ्यांना दीड लाख रुपयांची सुपारी दिली. मारेकऱ्यांनी घरात येऊन शैलेशचा गळा आवळून खून केला. त्यानंतर निमसे यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीतल्या डिक्कीत घालून देवचरी जंगलात अर्धवट जाळून टाकण्यात आला... त्यामुळे या खूनाला राजकीय हत्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, सीसीटीव्ही आणि इतर कागदपत्रांच्या आधारे ठाणे पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला... आणि त्यानंतर साक्षीला अटक करण्यात आली होती.